मुंबई : राज्यातील भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे राज्यातील 141 खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी तब्बल 282 शिक्षकांची पदे ही मंजूर करण्यात आली आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.
हा मोठा निर्णय मंत्री अतुल सावे यांनी घेतला आहे. राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना इंग्रजी व विज्ञान विषयांसाठी शिक्षक मिळणार असून विज्ञान शाखेसाठी वाढीव प्रत्येकी 2 विषय शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आलीत. म्हणजेच काय तर 282 शिक्षकांची पदे ही भरली जाणार आहेत. मंत्री अतुल सावे यांनी ही आश्वासने अधिवेशनात दिली होती. फक्त हेच नाही तर कला, वाणिज्य, आणि विज्ञान अशा दोन विद्या शाखेमध्ये असलेल्या आश्रमशाळांसाठी एकूण 8 शिक्षक मिळणार आहेत.
उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या (कनिष्ठ महाविद्यालय) विज्ञान शाखेसाठी वाढीव दोन शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. ज्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत (कनिष्ठ महाविद्यालयात) कला/वाणिज्य आणि विज्ञान अशा दोन विद्याशाखा आहेत. त्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत एकूण 8 शिक्षकांची पदे अनुज्ञेय होतील.
मंजूर पदे 6 व अधिक नव्याने गणित, विज्ञान विषयासाठी मंजूर होणारी 2 पदे असतील. त्यापैकी कला, वाणिज्य विशेष विषय शिक्षकांची 2 आणि मराठी व इंग्रजी विषय शिक्षकाची 2 पदे असतील. याशिवाय उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या विज्ञान शाखेस गणित, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विशेष विषयांकरीता प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 4 विषय शिक्षक अनुज्ञेय आहेत.