जळगाव । राज्यातील वातावरणात पुन्हा बदल पाहायला मिळत आहे. जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमान घसरले आहे तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्यावरील अवकाळीचे सावट कायम असून आज पुन्हा विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातही आजपासून दोन दिवस तुरळक पावसाचा अंदाज आहे.
आज या जिल्ह्यांना इशारा
आग्नेय राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला गेलाय. राज्यात पावसाला अनुकूल हवामान असल्याने आज विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशाऱ्यासह ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
जळगावात कसं राहणार हवामान?
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील तापमानात बदल पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसापूर्वी तापमान ४० अंशावर गेल्याने उन्हाने जळगावकर होरपळून निघत होता. मात्र गेल्या तीन चार दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट पाहायला मिळतेय. ढगाळ वातावरणामुळे बुधवारी उन्हाचा पारा ३८ अंशावर आला. तसेच सध्या सकाळी वातावरणात गारवा जाणवत आहे. यामुळे उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळत आहे.
दरम्यान, आज आणि उद्या जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज असून १४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.