राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ; पावसाबाबत हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज

पुणे : राज्यात जून महिन्यात महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावली. यामुळे पेरण्या मार्गी लागल्या. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच ब्रेक घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके करपू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी राजा मोठ्या आतुरतेने पावासाची वाट पाहू लागला आहे. श्रावणसरीसारखा रिमझिम स्वरुपाचा पाऊस काही भागांत पडत आहेत. यातच आता पुढील पाच दिवस पावसाचा कोणताही अलर्ट पुणे हवामान विभागाने दिला नाही. यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली आहे..

यंदा पावसावर अल निनोचा प्रभाव दिसत आहे. यावर्षी पावसाळा चार महिन्यांचा ऐवजी आतापर्यंत एका महिन्याचा झाला आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झालाच नाही. राज्यात ७ जून रोजी दाखल होणारा मान्सून यंदा २५ जून रोजी आला. त्यानंतर जुलै महिन्यात पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच ब्रेक घेतला आहे. राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे वातावरण नाही, असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. यामुळे पावसाचा ब्रेक ऑगस्ट महिन्यात मोठा झाला आहे.

यामुळे पुढील पाच दिवस राज्यभरात पावसाची उघडीप राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. सध्या मोसमी पावसाचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे निघून गेले आहे.

पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पेरण्या जूनच्या अखेरीस झाल्या. कारण जूनमध्ये अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता. अनेक शेतकऱ्यांची पिके वर आली आहेत. मात्र, पिकांना पाणी मिळत नाहीये. या पिकांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आवाहन आहे की, काही भागात हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस असण्याची शक्यता आहे. मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याची स्वत:हून शेततळे किंवा इतर माध्यमातून नियोजन करावं’. असंही ते म्हणाले