भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाद्वारे खनिज सर्वेक्षण व समन्वेषणाच्या १२ भूवैज्ञानीय योजनांमुळे नागपूर जिल्ह्यात कायनाईट, सिलिमनाईट या खनिजांचे साठे शोधण्यात आले असून, नागपूर शहर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात चुनखडक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॉक्साईड, तांब्याचाही विपुल प्रमाणात साठे उपलब्ध असल्याचा शोध लागला. परमाणू खनिज संचालनालयातर्फे गोंदिया व छत्तीसगड सीमाक्षेत्रात बिजली रायोलाईट या भूस्तरात युरेनियम खनिजांची पूर्वेक्षण योजना प्रस्तावित आहे. राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची ६० वी बैठक अतिरिक्त मुख्य सचिव (खनिकर्म) इकबालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत २०२३- २४ मध्ये संचालनालयातर्फे राबविण्यात आलेल्या योजना तसेच २०२४-२५ मध्ये प्रस्तावित असलेल्या खनिज सर्वेक्षणाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.
गोंदिया-छत्तीसगड क्षेत्रात युरेनियमचे पूर्वेक्षण
भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयातर्फे राज्यात १२ भूवैज्ञानीय योजनाद्वारे खनिज सर्वेक्षण व समन्वेषण करण्यात आले असून, यात चूनखडक कायनाईट-सिलिमनाईट, बॉक्साईट शोध घेण्यात आला. २०२४- २५ या वर्षात खनिज सर्वेक्षण- पूर्वेक्षणाच्या १५ योजना राबविण्यात येणार आहे. या योजना चंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर व भंडारा या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यात इतर खनिजासोबत तांबे पूर्वेक्षणाचाही समावेश करण्यात आला. भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षणतर्फे तांबे, बॉक्साईट रेअर अर्थ एलिमेंट या खनिजांच्या सर्वेक्षणाला प्राधान्य देण्यात आला. मॉईलतर्फे भंडारा व नागपूर जिल्ह्यातील चिखली, डोंगरी बाजार, कांद्री व बेलडोंगरी, सतक येथे पूर्वेक्षणाचे काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपयोजना केंद्रातर्फे वेकोलिच्या खाणींचे सॅटेलाईट सर्वेक्षण करून नकाशावर आरेखन तसेच खरीप व रबी पिकांच्या नुकसान भरपाई संदर्भात सॅटेलाईट नकाशांचा अभ्यास करण्यात आला आहे.