राज्यात १ लाख १७ हजार कोटींच्या ४ विशाल प्रकल्पांना मान्यता! २९ हजार रोजगार निर्मित होणार

मुंबई : राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, दि. ५ सप्टेंबर रोजी मान्यता दिली. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत मान्यता दिलेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही ‘इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य’ अशी होणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यापूर्वी जुलै महिन्यात झालेल्या उपसमितीच्या बैठकीत ८० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात झालेल्या बैठकांमध्ये एकूण दोन लाख कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. ज्यामुळे ३५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उद्योग मंत्री उदय सामंत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

टॉवर सेमीकंडक्टर कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प पनवेल जि.रायगड येथे करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात ५८ हजार ७६३ कोटी तर दुसऱ्या टप्यात रूपये २५ हजार १८४ कोटी अशी एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. याप्रकल्पामुळे १५ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया कंपनीचा प्रकल्प पुणे येथे एकात्मिक पध्दतीने स्थापना करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण १२ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे एक हजार रोजगार निर्मिती होणार असून प्रकल्पातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रीक व्हेईकलचे निर्मिती केली जाणार आहे.

इलेक्ट्रिक वाहननिर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य होणार
– टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचा प्रकल्प राज्याचे इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन धोरणांतर्गत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २१ हजार २७३ कोटी एवढी गुंतवणूक होणार असून त्यामाध्यमातून १२ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होण्यास मदत होणार आहे.

– या प्रकल्पामुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होईल. मराठवाडयातील सूक्ष्म,लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा फायदा होणार आहे. इलेक्ट्रीक वाहनाच्या वापरामुळे हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होऊन हवेची गुणवत्ता आणि हवामान बदल कमी होण्यास हातभार मिळणार आहे.

– यापूर्वी जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी यांचा छत्रपती संभाजीगनर येथे इलेक्ट्रीक वाहन निर्मितीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर यांचा इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक होणारा छत्रपती संभाजीनगर येथील दुसरा अतिविशाल प्रकल्प असून या क्षेत्राचा सर्वंकष विकास होण्यास चालना मिळणार आहे.

– रेमंड लक्झरी कॉटन्स यांचा वस्त्रोद्योग धोरणांतर्गत स्पिनींग, यार्न डाइंग, विव्हींग ज्यूट, विव्हींग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटन ह्या उत्पादनांच्या निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ नांदगाव पेठ, जि.अमरावती येथे होणार आहे. याप्रकल्पात १८८ कोटी एवढी गुंतवणूक आणि ५५० रोजगार निर्मिती होणार आहे.

कुठे किती गुंतवणूक

तळोजा एमआयडीसी, पनवेल
अदानी समूहासह टॉवर सेमीकंडक्टर
गुंतवणूक – एकूण : ₹ ८३,९४७ कोटी
टप्पा १ : ₹ ५८,७६३ कोटी
टप्पा २ : ₹ २५, १८४ कोटी
उत्पादन: ॲनालॉग / मिश्रित सिग्नल,
सेमीकंडक्टर उत्पादन.
रोजगार: ५,००० पेक्षा जास्त नोकऱ्या

स्कोडा फोक्सवॅगडॉन चाकण, पुणे
उत्पादन: इव्ही कार आणि हायब्रीड कार
गुंतवणूक: ₹ १५,००० कोटी
रोजगार: १००० पेक्षा जास्त नोकऱ्या

AURIC, टोयोटा किर्लोस्कर,
छत्रपती संभाजीनगर
उत्पादन : हायब्रीड वाहने, प्लगइन हायब्रीड वाहने, इंधन सेल ईव्ही, बॅटरी इलेक्ट्रिक वाहन
गुंतवणूक: ₹ २१,२७३ कोटी
रोजगार: ८८०० पेक्षा जास्त नोकऱ्या