मुंबई : महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचं एक पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासाठी सरकारने नवीन जीआर काढला आहे. आतापर्यंत जवळपास दीड कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिल जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील, असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यापूर्वी या योजनेचे अर्ज मंजूर करण्याचं काम 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलं होतं. मात्र, आता केवळ अंगणवाडी सेविका अर्जांना मंजुरी देऊ शकतात. यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका, “समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, ,आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना होते. मात्र, नव्या शासन निर्णयानुसार आता केवळ अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करु शकतात.