राज ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार परशुराम उपरकर मनसेतून बाहेर

कणकवली: महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे माजी सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आजपासून मनसेशी कोणताही संबंध असणार नाही, असे पत्रक मनसे नेते शिरीष सावंत यांनी जाहीर केले. उपरकर यांनीही आपण मनसे पक्षसदस्यत्‍व व इतर पदांचा राजीनामा दिल्‍याचे जाहीर केले.आता कार्यकर्ते जो निर्णय घेतील, त्‍याच्याशी बांधिल राहू आणि पुढील राजकीय वाटचाल सुरू ठेवणार असल्‍याचेही श्री. उपरकर यांनी स्पष्‍ट केले. एक्‍स (ट्विटर) या संकेतस्थळावरील मनसेच्या अधिकृत अकाउंटवरून दुपारी दीड वाजता श्री. उपरकर आणि प्रवीण मर्गज ह्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कोणताही संबंध असणार नाही, असे पत्रक जारी केले.

मनसे नेते सावंत यांनी दुपारी अडीच वाजता त्याबाबतचे पत्रक जारी केले. त्‍यानंतर श्री. उपरकर यांची मनसेतून हकालपट्टी झाल्‍याचे वृत्त माध्यमांतून जाहीर झाले आणि सिंधुदुर्गच्या राजकारणात खळबळ उडाली. यावर श्री. उपरकर यांनी तातडीने खुलासा करत पक्षातून हकालपट्टी झालेली नाही, तर मी स्वत:हून पक्ष सदस्यत्व आणि इतर पदांचा राजीनामा दिल्‍याचे जाहीर केले.

डिसेंबर २०२२ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौरा केला होता. या दौऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून अल्‍प प्रतिसाद मिळाला. त्‍यामुळे श्री. ठाकरे यांनी या दौऱ्यावेळीच सिंधुदुर्गची मनसे कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्‍यानंतर ठाकरे आणि उपरकर यांचे बिनसल्‍याच्या चर्चा होत्या. कोकण दौऱ्यानंतर श्री. ठाकरे यांनी कोकणासाठी संपर्क नेत्‍यांची घोषणा केली. यात श्री. उपरकर यांना स्थान देण्यात आले नव्हते.या वर्षभरात मनसे नेते सावंत यांनी देवगड तसेच जिल्ह्याच्या इतर ठिकाणी बैठका घेऊन मनसे कार्यकारिणीची नव्याने बांधणी केली होती. या बैठकांवेळी श्री. उपरकर यांना स्थान दिले नव्हते. मनसेच्या नव्या कार्यकारिणीमध्ये उपरकर समर्थकांना स्थान मिळाले नसल्‍याने कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस होती. आता खुद्द उपरकर यांनाच पक्षाबाहेर केले आहे. त्‍यामुळे श्री. उपरकर आणि त्‍यांचे समर्थक पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्‍टीने कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.