जळगाव : लग्नातील सोन्याचे दागिने घेवून नववधू पसार झाल्याही घटना १७ रोजी शहरातील शनिपेठ येथे घडली. या प्रकरणी लग्न जुळविणाऱ्याचार जणांविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव महानगरपालिकेत व्हॉलमन म्हणून नोकरीस असलेले शरद काशिनाथ चौधरी यांचा मुलगा मयुर याचे लग्न करायचे होते. त्यांना १३ फेब्रुवारी रोजी त्यांना पूजा विजय माने या महिलेचा फोन आला. महिलेने आमच्याकडे मुलगी असून तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे येवून मुलगी बघून घ्या असे सांगितले.
मुलगी पाहिल्यानंतर पसंती झाली. माने या महिलेने त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली. परंतु चौधरी यांनी आम्ही एक लाख रुपये देण्यास तयार असल्याचे सांगत ते लग्नाच्या तयारीला लागले. १६ मार्च रोजी तरसोद येथील गणपती मंदिरात नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये मयूर चौधरी याचे नंदीनी गायकवाड या तरुणीसोबत लग्न लागले. यावेळी मुलीकडून पूजा माने, नंदीनीची मैत्रीण नीता अर्जुन गणवार, मावशी, मुलीचा मावसभाऊ असे हजर होते. लग्न आटोपल्यानंतर चौधरी यांनी पूजा माने हिला एक लाख रुपये दिले.
लग्न आटोपल्यानंतर सायंकाळी सर्वजण घरी परतले. दिवसभराचा थकवा आल्यामुळे रात्री सर्वजण गाढ झोपलेले असताना १७ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास नववधू नंदीनी व तिची मैत्रीण या घरात दिसल्या नाही. त्यामुळे चौधरी कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. मात्र तरी देखील त्या सापडल्या नाहीत. यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना सांगितले की, पहाटेच्या सुमारास एक काळ्या रंगाच्या चारचाकीत बसून नववधू व तिच्या मैत्रीणीला जाताना पाहिले.
चौधरी यांचे साडू रवींद्र चौधरी हे त्यांना भेटले असता त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी पूजा व नंदीनीने फसवणूक करून लग्ल लावून दिल्याची बातमी वाचली. त्या वेळी चौधरी यांना समजले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिरुर येथे पूजा माने या महिलेने नंदीनीचे वैजापूर तालुक्यातील तरुणासोबत लग्न लावून दिले आहे. त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी चौधरी यांनी शनिपेठ पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार नववधूसह अन्य दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.