केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा दावा सादर केला आहे. 17 फेब्रुवारीरोजी त्यांनी बेंगळुरू येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले की, लोकसभेत माझ्या पक्षाचा एकही सदस्य नाही. मी शिर्डी किंवा सोलापूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. याबाबत लवकरच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘माझ्या पक्षाचा लोकसभेत एकही सदस्य नाही. २०२४ ची लोकसभा निवडणूक शिर्डी किंवा सोलापूरमधून लढवण्याचा माझा विचार आहे. मला लोकसभेत यायचे आहे. मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्याशी या विषयावर चर्चा करेन, त्यानंतर मी निर्णय घेईन.