रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट विधानसभेच्या १० तर मुंबई महापालकेत २० जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. ते मुंबई येथील प्रदेश कार्यकारणी आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची काय भूमिका राहील याबाबत मार्गदर्शन केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात वेगवेगळ्या आघाड्या आहेत. सर्वसमावेश, अशी पक्षाची ओळख असल्याचे सांगून विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत पक्ष मैदानात असणार असल्याचे सांगून तयारी लागा, अशा सूचना रामदास आठवले यांनी यावेळी केल्या.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा महायुतीचा घटक पक्ष आहे. रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद आहे. महायुतीत असून, देखील रामदास आठवले यांनी विधानसभा आणि मुंबईत महापालिकेत किती जागा लढवणार, याची घोषणा करून टाकली. महायुतीत भाजप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील विधानसभेत किती जागा लढवू शकते, याचा काहीसा अंदाज छगन भुजबळ यांनी जाहीर केला. जागा वाटपावर महायुतीतील प्रमुख पक्षांची बैठक होण्यापूर्वीच पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांकडून किती जागा लढणार, याच्या घोषणा सुरू झाल्या आहेत. यामुळे महायुतीत प्रमुख भारतीय जनता पक्षात काळजीचे वातावरण आहे.