जळगाव : जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ ७ मे रोजी भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता. चार जणांचा मृत्यू झाल्यानंतरही या घटनेतील आरोपींना अटक होत नसल्याने राजकीय दबाव असल्याचा आरोप मयत व्यक्तींच्या कुटुंबियांनी केला होता. दरम्यान, तब्बल १७ दिवसांनी अर्थात आज गुरुवारी चार जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश रेड्डी यांनी दिली.
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील रहिवासी राणी सरदार चव्हाण (३०) या ७ मे रोजी सोमेश सरदार चव्हाण (२), सोहन सरदार चव्हाण (७) आणि लक्ष्मण भास्कर राठोड (१२) यांच्यासह जळगाव येथे कामानिमित्त निघाल्या होत्या. रामदेववाडी जवळ अचानक भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील आरोपींना अटक व्हावी, यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन देखील केले होते.
आरोपींना अटक होत नसल्याने राजकीय दबाव असल्याचा आरोप मयत व्यक्तींच्या कुटुंबियांनी केला होता. दरम्यान, या दुर्घटनेत कारमधील अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश संजय पवार या दोघांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज जळगाव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून जळगाव येथे त्यांना आणले जात असल्याची माहिती दिली आहे.