रामनवमीच्या निमित्ताने १७ एप्रिल रोजी प्रसाद म्हणून १,११,१११ किलो लाडू अयोध्येतील राम मंदिरात प्रसाद म्हणून पाठवले जाणार आहेत. देवराह हंस बाबा ट्रस्टतर्फे हे लाडू प्रसाद म्हणून पाठवले जाणार असल्याची माहिती देवराह हंस बाबा ट्रस्टचे विश्वस्त अतुलकुमार सक्सेना यांनी दिली.काशी विश्वनाथ असो किंवा तिरुपती बालाजी मंदिर असो, दरआठवड्याला विविध मंदिरांमध्ये लाडूचा प्रसाद पाठवला जातो.
२२ जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देवराह हंसबाबा आश्रमाने ४० हजार किलो लाडू प्रसादासाठी पाठवले होते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अयोध्येत रामनवमीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. रामनवमीला येथे मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याने सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. रामनवमीचा सोहळा शांततेत व्हावा यासाठी पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.अयोध्येत ९ एप्रिलपासून रामनवमीचा उत्सव सुरू झाला आहे. तो १७ एप्रिलपर्यंत कायम राहणार असून, किमान २५ लाख भाविक या कालावधीत अयोध्येला भेट देतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. सुरक्षेसाठी रामनवमी मेळा परिसर एकूण सात झोनआणि ३९ सेक्टरमध्ये विभाजित करण्यात आला आहे.
वाहतूक व्यवस्था दोन झोन तसेच ११ क्लस्टरमध्ये विभाजित करण्यात आली आहे. जत्रेदरम्यान संपूर्ण परिसरात भाविकांच्या सुरक्षेसाठी ११ अतिरिक्त पोलिस अधीक्षक, २६ पोलिस उपअधीक्षक, १५० निरीक्षक, ४०० उपनिरीक्षक, २५ महिला उपनिरीक्षक, १३०५ हवालदार, २७० महिला मुख्य हवालदार, पीएसीच्या १५ कंपन्या, एसडीआरएफचे एक पथक, एटीएसचे एक पथक तैनात केले जाणार आहे.