रामललाच्या चरणी महिनाभरात दहा किलो सोने अर्पण

अयोध्या:  उत्तरप्रदेशची धार्मिक राजधानी म्हणून ओळखले जात असलेल्या अयोध्या नगरीतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुक्रवारी एक महिना पूर्ण झाला. या कालावधीत देशातील ६० लाखांहून अधिक भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. प्रत्येक भाविक आपापल्या कुवतीनुसार रामललासाठी देणगी आणि आभूषणे अर्पण करीत आहे. लाडक्या रामललासाठी रोख रकमेच्या स्वरूपात २५ कोटींहून अधिक रक्कम प्रभू रामाच्याचरणी अर्पण केली आहे.

सोने-चांदीच्या आभूषणापासून बनविलेल्या विविध वस्तूंची भेटही देण्यात आली आहे.२५ किलो चांदी आणि १० किलो सोने राम मंदिर व्यवस्थापन समितीच्या दानपेटीत जमा झाले आहे.२२ जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीची गर्भगृहात प्रतिष्ठापना करण्यात आली. दुसऱ्या दिवसापासून प्रभू रामललाचे दर्शन देशवासीयांसाठी खुले करण्यात आले. भाविकांची गर्दी रोज वाढत असल्याने दर्शनाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपासून रामललांना दुपारी थोडा वेळ विश्रांती देण्याचा निर्णय झाला आहे.

विविध आभूषणे

रामललासाठी सोने, चांदीच्या दागिन्यांपासून बनविलेली आभूषणे अर्पण केली जात आहेत. सोन्या-चांदीच्या भांड्यासह हार, मुकुट, चुडी, खेळणी, पायल, धनुष्यबाण, अगरबत्ती स्टॅण्ड, दीप आदी विविध आभूषणांचा यात समावेश आहे.