‘भारतीयांचा सर्वात आनंदाचा दिवस कोणता’ असा प्रश्न आज केला तर ‘२२ जानेवारी’ हे एकच उत्तर एकसुरात येईल. ‘मंदिर वही बनायेंगे, पर तारीख नही बतायेंगे’ अशी टिंगल करणाऱ्यांच्या कानशिलात जोरदार बसली. या दिवशी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे उद्घाटन झाले. भारतीय मोठे भाग्यवान आहेत.दिवाळीच्या आधीच लोकांनी दिवाळी साजरी केली. रामाच्या मंदिरात मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवाळीपेक्षा भारी होता. या सोहळ्याचे आमंत्रण देशभरातील निवडक लोकांना देण्यात आले होते. मात्र, काहींनी यातही राजकारण पाहिले. आमंत्रण होतं आणि नव्हतं, अशा काहींनी आमंत्रणावरून गदारोळ केला. भाजपा मंदिराच्या आडून राजकारण करीत आहे, असा विरोधकांचा सूर होता. शरद पवारांना आमंत्रण होतं. मात्र, आम्ही मंदिर पूर्ण झाल्यावर जाऊ, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली. उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणे पसंत केले. रामाच्या मंदिरापासून दूर अंतर ठेवणारे नकळत सापळ्यात अडकले आहेत.
मंदिराला विरोध करणारे राजकारणच खेळले. मग मंदिर उभे होत आहे तर भाजपाने तो सोहळा धूमधडाक्याने का साजरा करू नये? भाजपा परिवाराने केले ते रामकारण होते, राजकारण नव्हते. मुळात विरोधकांना डावपेच समजलेच नाहीत. अयोध्येकडे दुर्लक्ष करून आपण खूप मोठे राजकारण करीत आहोत, असे समजणारे विरोधक तोंडघशी पडणार आहेत. कुठल्याही बाजूने नसलेले तटस्थ हिंदू यामुळे नकळत भाजपाकडे ढकलले गेले आहेत. आपण भाजपासमर्थक नाही, हे विरोधकांना आणि खासकरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना दाखवायचे होते. मात्र, त्या धडपडीत त्यांनी तटस्थ हिंदूंना दुखावले. आपल्या देशात ८० टक्के हिंदू आहेत. सारेच्या सारे भाजपा समर्थक असतील अशातला भाग नाही; मात्र हिंदूंच्या विरोधात बोलणे यातल्या बहुतेक तटस्थ हिंदूंना सहन होत नाही. या तटस्थ हिंदूंच्या जोरावरच उद्धव आणि काँग्रेसवाले उड्या मारत आले. या मोठ्या लोकसंख्येची सहानुभूती विरोधकांनी गमावली आहे. मुळात विरोधकांनी नाकारावीत म्हणूनच ही आमंत्रणं गेली असतील. आपल्यालाच खूप राजकारण समजते असे समजणारे विरोधी नेते इथेच नकळत अडकले आहेत. त्यांचा खरा बुरखा फाटला आहे.
शरद पवार म्हणा की उद्धव म्हणा, विरोधकांना जनतेने मागेच झिडकारले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा राजकीय वनवास खऱ्या अर्थाने आता सुरू झाला आहे वडिलांच्या शब्दाखातर प्रभू रामचंद्र १४ वर्षे वनवासात गेले होते. ठाकरे-पवार यांचा वनवास बेमुदत असणार आहे. अयोध्येत माथा टेकवून झालेल्या चुकांची कबुली देण्याची या विरोधकांना संधी होती. ती त्यांनी गमावली. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खडगे यांना आमंत्रण होते. ते त्यांनी नाकारले. गांधी घराण्याचे टेन्शन वेगळे आहे. अयोध्येला गेलो तर मुस्लिम नाराज होतील, याची काँग्रेसला भीती वाटते. काँग्रेसची व्होट बँक आटत चालली आहे. पूर्वी हिंदूंची बहुसंख्य मतं काँग्रेसला मिळायची. आता ती परिस्थिती नाही. अयोध्येला गेलो तर हिंदूंची काही मतं मिळतील. मात्र, मुस्लिमांची ठोक मतं हातची जातील, असे काँग्रेसला वाटते. मुस्लिम व्होट बँक २० टक्के आहे. ती तरी हातची जाऊ नये यासाठी काँग्रेसची धडपड आहे. किमान मुस्लिम मतं मिळाली तर काही जागा पदरात पडतील. ‘भागते भूत की लंगोटी सही…’ अशी काँग्रेसची मानसिकता आहे. त्याच मानसिकतेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार आले आहेत. त्यामुळेच अयोध्येला जाणे त्यांनी टाळले. नाशिकला गेले.
नाशिकच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे भगव्या कपड्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे गळ्यात रुद्राक्ष घालायचे. उद्धवही रुद्राक्षाची माळ घालून आले होते. मात्र, केवळ रुद्राक्ष घातले म्हणजे बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती. बाळासाहेबांकडे रिमोट कंट्रोल होता. पण त्यांनी कधी मंत्रिपद घेतलं नाही. ‘माझा बाप चोरला’ म्हणणाऱ्या उद्धव यांनी स्वतःसाठी तर मुख्यमंत्रिपद लाटलेच; मुलालाही मंत्री बनवले. एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून सारे बडे नेते मातोश्रीवर यायचे. आता काँग्रेसशी बोलायचे तर उद्धव यांना दिल्लीला मुजरा करायला जावे लागते. बाळासाहेबांचे हिंदुत्व कट्टर होते. उद्धव यांनी हिंदुत्व गुंडाळून ठेवले. अयोध्येला चाट मारण्यामागे उद्धव यांची मुस्लिम तुष्टीकरणाची मानसिकता आहे. हिंदुत्वाशी म्हणजेच पर्यायाने भाजपाशी नाते तोडल्याने उद्धव यांच्या शिल्लक सेनेला आता सर्वस्वी मुस्लिम व्होट बँकेवर विसंबून राहणे भाग आहे. राम कुण्या एका राजकीय पक्षाची मालमत्ता नाही, असे उद्धव म्हणाले; ते खरे आहे. पण राम आता शिल्लक सेनेचीही मालमत्ता राहिलेला नाही, हेही तेवढेच खरे ! कुठे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि कुठे स्वतःच्या क्षुद्र महत्त्वाकांक्षेपोटी मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे उद्धव ठाकरे. शरद पवारांच्या नादी लागून उद्धव यांनी स्वतःला संपवले. देवेंद्र फडणवीस यांचा फोन घेत नव्हते उद्धव. सारी मस्ती आता निघते आहे. आता सुटका नाही. प्रभू रामचंद्र स्वमंदिरात आले असताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्याही नशिबी राजकीय वनवास आला आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडी कोणाची उधारी शिल्लक ठेवत नाहीत. भाजपाशी युती तोडून आणि पुढे फडणवीस-अजित पवार यांचे अडीच दिवसाचे सरकार पाडून शरद पवार-उद्धव ठाकरे जोडीने केलेल्या दगाबाजीचा हिशोब आता चुकता झाला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. महाआघाडी आणि पुढे इंडिया आघाडीच्या जोरावर उद्धव ठाकरे यांनी मोठी स्वप्नं पाहिली होती; पण आज काय अवस्था आहे या दोन्ही आघाडीची. महाराष्ट्रात महाआघाडीच्या पोपटाने केव्हाच मान टाकली. तिकडे इंडिया आघाडीत पळापळ सुरू झाली आहे. ममतादीदीने बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार आहे. मोदींशी टक्कर घेऊ पाहणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उद्या भाजपाच्या जवळ आले तर आश्चर्य वाटायला नको. निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे प्रत्येक विरोधी पक्षाने वेगवेगळे तंबू ताणलेले दिसतील. विरोधी पक्ष एकत्र येऊच शकत नाहीत. कारण, त्यांच्याकडे विकासाचा कार्यक्रमच नाही. मोदी विरोध हाच त्यांचा अजेंडा होता. तो चालत नाही, हे देशाने गेल्या दोन निवडणुकांत पाहिले. ‘मोदी नाही तर कोण?’ या प्रश्नाचे उत्तर २०२४ मध्येही ‘मोदी’ हेच असणार आहे.