जळगाव: भागवत गीतेचा संपूर्ण भारतात अभ्यासक्रमात समावेश करावा. यासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले.जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरातील वडनेरी फाटा याठिकाणी शुक्रवारी चौथ्या दिवशी आयोजित विराट शिवपुराण कथा सोहळ्यात ते बोलत होते. कथेच्या चौथ्या दिवशी हजारो नव्हे तर लाखो मुखातून श्री शिवाय नम:त्सुभ्यमचा गजर पाहायला मिळाला. शिव भक्तीत लीन व्हा, सगळे सुख आपोआप आपल्याला प्राप्त होतील. भगवान महादेव न मागता सर्व काही भक्तांना देतात. धर्म परिवर्तन करू नका, आपल्या सनातन धर्मातच रहा, ज्यांनी धर्म परिवर्तन केले, ते चोर कुठेही गेले तरी चोरच राहणार, असेही भाविकांना निरूपणात पंडित मिश्रा यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत धर्म बदलू नका, असे आवाहनही त्यांनी शिवभक्तांना केले
मुलांवर संस्कारासाठी स्वत:त बदल करा
मुलांच्या सवयी बदलायच्या असतील तर आपण स्वत:हून काही सवयी बदलल्या पाहिजे. तुम्ही व्यसन सोडाल तर मुलांकडून निर्व्यसनाची अपेक्षा करू शकता. तुमची मुले संस्कारशिल घडविण्यासाठी आधी आपण संस्कार अंगिकारले पाहिजे. मुलांना आदरभाव शिकविला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी उपस्थित शिवभक्तांना केले.
महाराष्ट्रात संतांचा सर्वाधिक सन्मान
देशात जेवढा सन्मान महाराष्ट्रात होतो, तेवढा सन्मान कोणत्याही ठिकाणी होत नाही. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. या भूमीत अनेक संत होऊन गेले. ज्यांनी महाराष्ट्रात अध्यात्म आणि प्रबोधनात महत्वाचे कार्य केले. त्यात त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत मुक्ताई आदी संताच्या नावाचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे आईवडिलांप्रती व सुनेचा सासू सासऱ्याप्रती आदरभाव असणे गरजेचा आहे. कोणाचाही अपमान करू नका. प्रत्येकांशी सन्मानाने वागा. आदरभाव घरात जपला गेला पाहिजे.आपण घरात कसे वागतो, त्यानुसार मुलांवर संस्कार होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गायीचे महत्व कमी व्हायला नको
गायीला सनातन धर्मात महत्वाचे स्थान आहे. मात्र सध्या गायीचे महत्व कमी होत आहे. पूर्वी गाय हा विषय मुलांच्या अभ्यासात निबंध लेखनासाठी असायचा. मात्र आता हा विषय शाळांमध्ये दिला जात नाही. गायीविषयीचा भाव जागृत होत नसल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्रात वर्षांतून एकदा पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा केली जाते. चांगली परंपरा आहे. या दिवशी शेतकरी बैलास गोडधोड खाऊ घालून त्याची पूजा करतात. महाराष्ट्रातील शेतकरी बैल आवर्जून ठेवतात. त्यासाठी पंडित मिश्रा यांनी महाराष्ट्रातील शिवभक्तांसह शेतकऱ्यांचे कौतुक करीत त्यांनी जय महाराष्ट्राची घोषणाही दिली.