२२ जानेवारी २०२४ हा दिवस इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, यात काही शंका नाही. ज्या राम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर बनविण्याचे स्वप्न हिंदू समाजाने पाहिले होते ते स्वप्न या दिवशी साकार होणार आहे. याच भव्य मंदिरामध्ये रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. इसवी सन १५२८ मध्ये बाबराचा सरदार मीर बांकी याने अयोध्येवर आक्रमण केले आणि अयोध्येच्या मंदिराला ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मंदिराला तो पूर्णपणे ध्वस्त करू शकला नाही. त्याने त्या मंदिराचा कळस तोडून त्यावर एक घुमट बांधला. ज्या वेळेला अयोध्येच्या आजूबाजूला असलेल्या अनेक राज्यांना त्याने अयोध्येच्या मंदिरावर हल्ला केला, ही बातमी समजली त्यावेळेला आजूबाजूचे अनेक राजे आपल्या सैन्यासह या बाबराच्या सैन्याशी लढायला निघाले. ही बातमी ज्या वेळेला मीर बांकीपर्यंत पोहोचली, त्यावेळेला त्याने मंदिर ध्वस्त करण्याचा हा उद्योग सोडून तो आपल्या पुढल्या मार्गाला निघून गेला.
१५२८ ते ६ डिसेंबर १९९२ या जवळपास ४५० वर्षांच्या कालावधीमध्ये अक्षरशः ४०० पेक्षा अधिक लढाया हिंदू समाजाने वेगवेगळ्या आक्रमकांशी लढल्या. अयोध्येचे मंदिर हे हिंदू समाजाकरिता पूजाअर्चा करण्याकरिता खुले करण्यासाठी मोठा न्यायालयीन संघर्ष करावा लागला. १९९० सालच्या पहिल्या कारसेवेच्या वेळेला ज्यावेळेला देशभरातून कारसेवक अयोध्येमध्ये जमले होते, त्यावेळेस उत्तरप्रदेशमध्ये मुलायम सिंहने निरपराध, नि:शस्त्र कारसेवकांवर गोळीबार करवला, लाठीचार्ज करण्यात आला. अनेकांना बंदी बनविण्यात आले. या मुलायम सिंहने घोषणा केली होती की, ‘परिंदा भी पर नही मार सकता!’ परंतु, शेकडो किलोमीटरचे अंतर कारसेवक पार करून अयोध्येमध्ये कारसेवा करण्यासाठी शिरले. कारसेवकांवर अत्याचार करणाऱ्या मुलायम सिंहाला उत्तरप्रदेशच्या जनतेने सत्तेवरून खाली खेचले. १९९२ च्या कारसेवेच्या वेळेला उत्तरप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार होते.
त्यावेळच्या प्रशासनाने दुसऱ्या कारसेवेच्या वेळेला सर्व पोलिस आणि राज्याच्या इतर दलांना आदेश दिले होते की, कोणीही कारसेवकांवर गोळीबार करणार नाही. ज्या वेळेला कारसेवक राम जन्मभूमीच्या परिसरात जमले होते त्यावेळेस असे ठरले होते की, शरयू नदीतून एक एक मूठ वाळू आणायची व त्यानंतर सर्वांनी कारसेवा करायची. परंतु, देशभरातून आलेला लाखो लोकांचा जमाव वादग्रस्त ढाच्याच्या परिसरात शिरला. पाहता पाहता लोक त्या घुमटावर चढू लागले. मिळेल त्या साधनांनी घुमटाला तोडण्याचे काम सुरू झाले आणि पाहता पाहता एवढा मोठा घुमट जमीनदोस्त करण्यात आला व तेथे प्रभू श्रीरामचंद्रांचे एक अस्थायी छोटेसे मंदिर बांधण्यात आले. भारतातल्या प्रत्येक राज्यातून कानाकोपऱ्यातून हे कारसेवक आले होते. त्यांच्या उपस्थितीत गुलामीचा हा कलंक मिटवून टाकला गेला. राम या देशातील जनमानसामध्ये वसलेले आहेत.
लोक एकमेकांना भेटले तर म्हणतात ‘राम राम’ महाराष्ट्रामध्ये एखाद्याचे नाव ‘रामराव’ असते, तामिळनाडूमध्ये एखाद्याचे नाव ‘रामस्वामी’ असते, उत्तरप्रदेशमध्ये एखाद्याचे नाव ‘रामप्रसाद’ असते, आंध्रप्रदेशामध्ये ‘रामन्ना’ असते. यावरून आपल्या लक्षात येते की, राम सर्वत्र व्याप्त आहे. भारतामध्ये अनेक उपासना पद्धतीचे लोक आहेत. त्यामध्ये रामाची उपासना करणारे लोक आहेत आणि न करणारेसुद्धा आहेत. जे अहिंदू लोक आहेत उदाहरणार्थ मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी इत्यादी या लोकांचे उपासनेचे दैवत राम नाही, परंतु प्रभू श्रीरामचंद्र या भूमीत होऊन गेलेले आहे. इथला धर्म, इतिहास, संस्कृती, लोकव्यवहार या सर्वच प्रभू श्रीरामचंद्रांमुळे प्रभावित झालेले आहे. या देशाचा इतिहास रामापासून वेगळा करता येणे शक्य नाही. त्यामुळे ज्यांची उपासना पद्धती हदूंपेक्षा वेगळी आहे त्याही लोकांनी रामाची पूजा केली नाही तरी काही हरकत नाही, परंतु राम या देशाचा राष्ट्रपुरुष आहे, हे त्यांनीही मानायला काही हरकत नाही. बाबर हा एक परकीय आक्रमक होता. त्याने या देशावर हल्ला करून या देशातील एक मंदिर नावाची वास्तू तोडली आणि त्या ठिकाणी दुसरी काहीतरी वास्तू बांधण्याचा प्रयत्न केला.
त्याने जे तोडले ते मंदिर होते त्याने जे उभी करण्याचा प्रयत्न केला ती मशीद होती. परंतु, यावरून बाबर हा या देशातील मुसलमानांचा कोणीही होत नाही. कारण, बाबराचे युद्ध हे इब्राहिम लोधीशी झाले होते. या देशात राहणाऱ्या मुसलमानांसाठीसुद्धा राष्ट्रीय पुरुष प्रभू श्रीरामचंद्र आहे, बाबर नाही. त्यामुळे बाबरी ढाच्या पडला याचे दुःख कोणीही साजरे करण्याचे कारण नव्हते. परंतु, या देशातील काही राजकीय पक्षांनी आपली मुस्लिम एकगठ्ठा मतांची पोळी शेकण्यासाठी राम जन्मभूमी मंदिराचा प्रश्न इतकी वर्षे पेटवत ठेवला. हिंदूंच्या मतांना काँग्रेसने कधीही किंमत दिली नाही. हिंदूंच्या मतांची किंमत जर काँग्रेसला समजली असती तर त्यांनी राजकीय हुशारी दाखवून हा प्रश्न स्वतःच्या हातात घेऊन सोडवून दाखवला असता आणि हा प्रश्न जर सुटला असता तर केवळ दोन लोकसभेच्या जागा असणारी भाजपा नंतर ८९ जागांवर गेली नसती तेथून भविष्यात ती सत्ताधारी पण झाली नसती किंवा त्याला अजून अनेक वर्षे लागले असते. मुस्लिमांचे तुष्टीकरण व हिंदू मतांकडे दुर्लक्ष ही काँग्रेससाठी खूप मोठी घोडचूक ठरली. काँग्रेसच्या काळामध्ये ज्या लिबरहान आयोगाला १९९२ च्या बाबरी विध्वंसानंतर अहवाल द्यायला सांगितले होते, त्यांना तो रिपोर्ट चार महिन्यांत द्यायचा होता.
परंतु, काँग्रेस पक्षाला हा प्रश्न लवकर सोडवावा असे वाटत नव्हते. त्यांनी हा प्रश्न १७ वर्षे अजून पेटत ठेवला. आता रामललाच्या प्राणप्रतिष्ठेला जाण्यास काँग्रेसने नकार दिलेला आहे. यावरून अजूनही त्यांनी बोध घेतलेला नाही, हे आपल्या लक्षात येते. तुम्ही लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता; परंतु तुम्ही सर्वांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही. भारतातील जनतेने आम्हाला काय पाहिजे आहे ते घडविणारे सरकार या देशामध्ये आणून दाखविले. या देशातील पुरोगामी सेक्युलर लोकांनी जनतेला भ्रमित करण्याचे भरपूर प्रयत्न केले. राम जन्मभूमीवर धार्मिक सलोखा राहावा म्हणून कोणी म्हणाले तेथे इस्पितळ बांधा तर अजून कोणी काही सूचना केली. एखाद्या मशिदीच्या जागेवर इस्पितळ उभारा अशी सूचना मात्र हे लोक करू शकत नाही. या लोकांचाही खरा चेहरा देशातील जनतेच्या लक्षात आलेला आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर हे हिंदूंकरिता त्यांच्या आराध्य दैवताचे मंदिर असले, तरीही भारतात राहणाऱ्या विविध धर्मांच्या लोकांसाठी ते या देशाच्या राष्ट्रपुरुषाचे मंदिर आहे. त्यामुळे हे राम मंदिर नव्हे तर राष्ट्र मंदिर आहे.
अमोल पुसदकर