जळगाव । एकीकडे लोकसभा निवडणूक जवळ आली असून दुसरीकडे पक्षांतर सुरूच आहे. याच दरम्यान, जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील तब्बल 200 प्रमुख पदाधिकारी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
हे पदाधिकारी गाड्यांच्या ताफ्यासह जळगावहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. शरद पवार गटाचे पदाधिकारीही अजित पवार गटात प्रवेश करणार असल्यानं हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तर दुसरीकडे रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुदेश मयेकर यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुदेश मयेकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भविष्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला रत्नागिरीमध्ये खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आई वडील व भाऊ किरण सामंत यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आजारपणात किरण सामंत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मला आधार दिला अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे.