मुंबई: राज्यसभेच्या जागेसाठी प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी दुपारी विधानभवनातील निवडणूक कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते. मला खात्री आहे की निवडणूक बिनविरोध होणार आहे आणि आगामी काळात माझी रिक्त झालेली जागाही आमच्याकडेच राहणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानभवनाच्या बाहेर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारलेली मिठी चर्चेचा विषय ठरली. आव्हाड हे चंद्रकांत हंडोरे यांचा फॉर्म भरण्यासाठी विधानभवनात आले होते. ते पत्रकारांशी बोलत असताना, मागून आलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी आव्हाडांना थोडे बाजूला करत मिठी मारली. ‘अरे हे पण आमचेच आहेत, आज ना उद्या तेही येतील’, असे ते म्हणाल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.