राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य, धरणगावात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धरणगाव : राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात 11 जणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात अमोल सखाराम महाजन यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 8 नोव्हेंबर रोजी हाजी रफिक कुरेशी फाउंडेशन धरणगाव या मुस्लीम संघटनेतर्फे जुलूस ए गौसीया ही मिरवणूक काढण्यात आली. त्यासाठी त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली होती. याबाबत मला माहीत असून, त्या दिवशी मीसुध्दा धरणगाव शहरात जैन गल्लीत हजर होतो. ही मिरवणूक दुपारी तीनला काढण्यात आली. या मिरवणुकीत अडीच ते तीन हजार लोक सहभागी झाले होते. मिरवणूक जैन गल्ली व बाजारपेठेत असताना सदर जुलुस मिरवणुकीतील काही जणांनी हमास या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ तसेच इतरही वादग्रस्त घोषणा दिल्या. तसेच हमास या दहशतवादी संघटनेचे झेंडे फडकविले.

यावेळी स्वत: तेथे हजर असल्याने माझ्या मोबाईलमध्ये घोषणांची ऑडीओ, व्हीडीओ शुटींग केली असल्याचे अमोल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. जुलूसमधील काही इसमांच्या हातात स्टीलचे रॉड होते. तसेच त्यांच्या हातात पॅलेस्टीन व हमास तसेच इतर झेंडे होते. संबंधितांनी भारताच्या एकतेला व अखंडतेला बाधा निर्माण होईल व दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, या उद्देशाने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असल्याचेही  महाजन यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी भादंवि कलम 153 (1) 188 प्रमाणे शेख रफिक शेख मुसा कुरेशी, इरफान शेख अरमान, मोहंमद इस्राइल युसुफ, नगर मोमीन, नदीमोदीन एजाजोद्दीन काझी, कालू उस्ताद, मोहंमद सलीम मोहंमद इसाक मोमीन, इब्राहीम जनाब उर्फ इत्तुजनाव, अमजदखान गुलाबखान बेलदार, मो. अयास मो, सिद्दीकी, जुनेद खान पूर्ण नाव माहीत नाही (सर्व रा.धरणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तापस पीएसआय संतोष पवार हे करीत आहेत.