राहूल गांधींच्या वक्तव्यानंतर राज्यभरात भाजप आक्रमक!

मुंबई : काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आरक्षणबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. शुक्रवारी, भाजपकडून राहूल गांधींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील विविध भागांत भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.

राहूल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी तिथे आरक्षण संपवण्याबाबत भाष्य केलं. त्यानंतर राज्यभरात त्यांच्या या वक्तव्याचा विरोध करण्यात येत आहे. तसेच राहूल गांधींच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीकाही करण्यात आली. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणं लोकप्रतिनिधीला शोभत नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहूल गांधींवर केली आहे. तर राहुल गांधी कोणत्याही व्यासपीठावर गेले तरी देशातील प्रत्येक वर्गाला त्यांचे हक्क मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

त्यानंतर आता राहूल गांधींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन सुरु आहे. तर अकोला येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे राहूल गांधींना आरक्षणाबाबतचे वक्तव्य चांगलेच महागात पडले आहे.