रिक्षाचालकाला मारहाण करून जबरी लूट; जळगावातील घटना, दोघांना पोलीस कोठडी

जळगाव : कंपनीत साहित्य पोहचविण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण करून पैसे काढून नेल्याची घटना एमआयडीत ८ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणातील आरोपींना शनिवारी १६ रोजी सकाळी १० वाजता रामेश्वर कॉलनीतून अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राकेश भिमराव सपकाळे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) व गोपाळ रवींद्र पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) असे आरोपींचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ शिदे हे ८ डिसेंबर रोजी त्यांच्या मालवाहू रिक्षाने औद्योगिक वसाहत परिसरात एका कंपनीमध्ये साहित्य पोहचविण्यासाठी गेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखींनी त्यांना मारहाण केली होती. तसेच त्यांच्या खिशातून बळजबरीने तीन हजार ५०० रुपये काढून घेतले होते. याप्रकरणी शिदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश भिमराव सपकाळे (रा. रामेश्वर कॉलनी) व त्याचा साथीदार गोपाळ रवींद्र पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) याच्या मदतीने केल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी दोघांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी दोघांना रामेश्वर कॉलनी परिसरातून शनिवारी १६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुलकर्णी यांनी पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. कोठडी सुनावण्यात आलेल्या दोघांपैकी राकेश सपकाळे याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.