भुसावळ : रेल्वेतील बडे अधिकारी तथा रेल्वे मंत्री ओळखीचे असल्याचे भासवत भुसावळातील भावंडांना रेल्वेत तिकीट निरीक्षक म्हणून नोकरी लावण्याच्या बहाण्याने ३० लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी भुसावळातील सागर शिवदास वानखेडे (इंद्रप्रस्थ नगर, शांतीनगर, भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ शहर पोलिसात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण भुसावळ शहरातील रेल्वे नार्थ कॉलनीतील महेंद्र प्रकाश संसारे (४०) हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी सागर शिवदास वानखेडे (शांतीनगर, भुसावळ) याने आपले रेल्वेतील बड्या अधिकाऱ्यांसह रेल्वे मंत्र्यांशी ओळख असल्याने तुमच्यासह भाऊ सचिन संसारे यांना रेल्वे खात्यात टी.सी. या पदावर नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत २ मे २०१७ ते डिसेंबर २०२३ दरम्यान वेळोवळी ३० लाख रुपये नॉर्थ कॉलनीतील घरी स्वीकारले.
रक्कम स्वीकारूनही दोन्ही भावांना रेल्वेत नोकरी न लागल्याने व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महेंद्र संसारे यांनी बुधवार, २० मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सागर शिवदास वानखेडे विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड हे करीत आहे.