रोखे खरेदीत रिलायन्सची क्विक सप्लाय तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली:  भारतीय स्टेट बँकेने जारी केलेले रोख्यांचे तपशील भारतीय निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर टाकले. या तपशीलांमध्ये निवडणूक रोखे घेणाऱ्याचे नाव, रोखे वटवणाऱ्या पक्षाचे नाव आणि रोख्यांचा अनुक्रमांकासारख्या तपशीलांचा समावेश आहे. रोखे खरेदीमध्ये फारशी प्रसिद्ध नसलेली रिलायन्सची उपकंपनी क्विक सप्लाय चेन प्रा. लि. ही कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीच्या पानांची संख्या ४०० पेक्षा जास्त आहे. यावर २० एप्रिल २०१९ ते २३ जानेवारी २०२४ पर्यंतचे तपशील टाकण्यात आले आहेत.

या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता नवी मुंबईतील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी येथील आहे. कंपनीने भाजपाला ३९५ कोटी, तर शिवसेनेला २५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. २०२१-२२ आणि २०२३-२४ या काळात कंपनीने ४१० कोटी रुपयांचे रोखे घेतले आणि त्यापैकी २५ कोटी रुपयांचे शिवसेनेला व उर्वरित भाजपाला दिले. गोदामे आणि स्टोरे युनिटचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने इतर कोणत्याही राजकीय पक्षाला निधी दिलेला नाही. क्विक सप्लाय कंपनी रोखे खरेदीच्या बाबतीत फ्युचर गेमिंग अॅण्ड हॉटेल सव्हिर्सेसच्या मागे आहे. या कंपनीने १,३६८ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले.

त्यानंतर हैदराबाद येथील मेघा इंजिनीअरिंग अॅण्ड इन्फ्राचा क्रमांक येतो या कंपनीने ९६६ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केली आहे. रिलायन्सशी संबंधित आणखी एक कंपनी हनीवेल प्रॉपर्टीज लिमिटेडने ८ एप्रिल २०२१ रोजी ३० कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले आणि ते भाजपाला दिले होते. मागील आठवड्यात रिलायन्ससोबत या कंपनीचा संबंध समोर आला, तेव्हा क्विक सप्लाय ही रिलायन्सची उपकंपनी नसल्याचे रिलायन्सच्या प्रवक्त्याने सांगितले होते.