लंडनच्या म्युझियममध्ये असलेली शिवरायांची वाघनखे ‘या’ महिन्यात होणार महाराष्ट्रात दाखल

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, यात प्रामुख्याने राज्यभरातील शिवपुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. या सर्व ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाच्या ३५० वर्षपूर्तीनिमित्त लंडनच्या म्युझियममध्ये असलेली त्यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची घोषणा शिंदे सरकारतर्फे करण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षी लंडनला जाऊन व्हिक्टोरिया एन्ड अल्बर्ट म्युझियमसोबत करारही केला होता . ही वाघनखे भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नववर्षात ती भारतात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर, या संदर्भातील जवळपास सर्व कायदेशीर आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ ते ५ मे रोजी ही वाघनखे भारतात दाखल होणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणल्यानंतर,चार संग्रहालयांत ती ठेवण्यात येणार आहेत. त्यात सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, नागपूर येथील सेंट्रल म्युझियम, कोल्हापूर येथील द लक्ष्मी विकास पॅलेस आणि मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा यात समावेश आहे.