लग्नाला घरच्यांचा विरोध, दोघांचा आत्महत्येचा प्रत्यत्न, एक ठार तर एक गंभीर जखमी

चाळीसगाव : तालुक्यातील बोढारे येथील प्रेमीयुगलाने शुक्रवार ७ रोजी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने यात तरुणी जागीच ठार झाली तर तरुणाचे पाय कापले गंभीर जखमी झाला. गेल्याने त्याच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी येथील रेल्वे पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

बोढरे येथील रिक्षाचालक तरुण सचिन गणपत चव्हाण (वय २२) याचे गावातील शीतल रामसिंग चव्हाण (वय १९) हिच्याशी प्रेमसंबंध होते. ती त्याच्याच जवळच्या नात्यातील होती. दोघे लग्न देखील करणार होते. परंतु,  जवळच्या नात्यातील असल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध दर्शविला. या विरोधामुळे आपले लग्न होणार नसल्याची त्यांना खात्री झाल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचे ठरविले. त्यानुसार गुरुवार, ६ जूनला  रात्री दोघांनी गावातून पळ काढत चाळीसगाव गाठले.  बोढरे येथे रात्री तरुणी  घरी न परतल्याने घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, तरुणी  कुठेही मिळून आली नाही. दरम्यान, घरून पळून गेलेले सचिन व शीतल यांनी चाळीसगाव रेल्वेस्थानकावर येऊन रात्री दीडच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले. यात शीतलचा जागीच मृत्यू झाला. सचिनचा मात्र एकच पाय रेल्वेखाली सापडल्याने तो कापला गेला. रेल्वे निघून गेल्यावर सचिनने जखमी अवस्थेत त्याच्या मोबाईलवरून बोढरेत भावाला कळविले. त्यानंतर त्याच्या नातलगांसह इतरांनी चाळीसगावला धाव घेऊन जखमी सचिनला खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यास धुळे येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.