लग्न करत आहात, ही तपासणी केली आहे का ?

तरुण भारत लाईव्ह । राहुल शिरसाळे । थॅलेसेमियाग्रस्तांच्या पालकांना आर्थिक मदत व्हावी या उदात्त हेतूने सोमवार ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिनी एका पालकाला व्यवसाय उभारणीकरिता सहाय्य करण्यास डॉ. सई नेमाडे यांनी पुढाकार घेत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

थॅलेसेमिया हा आजार संपूर्ण कुटुंबाला आर्थिक व मानसिक दृष्ट्या होरपळून काढतो. ज्या मुलांना हा आजार असतो त्यांच्या पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. ही बाब लक्षात घेऊन समाजाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे. अनेक पालक ऊस तोडी किंवा हात मजुरीने आपला उदरनिर्वाह करीत आहेत. अशातच जर बालक थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त असेल तर कुटुंबावर आर्थिक भार अधिक असतो.

दोन प्रकारात आजार
थॅलेसेमिया हा आजार मायनर आणि मेजर या दोन प्रकारात असतो. माता व पिता दोघेही थॅलेसिमिया मायनर असतील तर बाळाला थॅलेसेमिया मेजर हा गंभीर स्वरूपाचा आजार होण्याचे प्रमाण अधिक असते. विवाहपूर्वी प्रत्येक तरुण-तरुणी ने हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस ही रक्तातील तपासणी करून घेतली तर भावी पिढीचे या आजारापासून संरक्षण होईल. असे मत डॉ. सई नेमाडे यांनी व्यक्त केले. थॅलेसेमियाग्रस्ताला दर पंधरा दिवसांनी रक्त द्यावे लागते. तसेच सततचे आजार व हॉस्पिटलच्या वार्‍या त्यामुळे आर्थिक बोजा पालकांवर पडत असतो. अशा पालकांना जागतिक थॅलेसेमिया दिनापासून रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. त्याअनुषंगाने रामेश्‍वर पाटील (नाव बदललेले) या पालकाला कोसला फाऊंडेशनतर्फे २१ हजाराची मदत व्यवसाय सुरू करण्यासाठी डॉ.सई नेमाडे यांनी पुढाकार घेत आधी केले मग सांगितले या उक्तीची अनुभूती दिली आहे.

थॅलेसेमिया हा रक्ताचा अनुवंशिक आजार

थॅलेसेमिया हा रक्ताचा अनुवंशिक आजार आहे. आई-वडील दोघेही बाधीत असतील तर मुलांना मेजर स्वरूपाचा आजार असतो. लग्नाआधी प्रत्येक तरूण-तरूणीने हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस ही तपासणी करणे आवश्यक आहे. लग्नासाठी आपण कुंडली जुळवितो, ३६ गुण जुळवितो, त्याचप्रमाणे हा ३७ वा गुण जुळणे आवश्यक आहे. जर आपणास या आजारापासून मुक्त व्हायचे असेल तर प्रत्येक तरूण-तरूणीने हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस तपासणी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी जिल्ह्यासाठी एक मॉडेल उभे केले आहे. यात महात्मा फुले योजनेंतर्गत या बालकांसाठी स्वतंत्र थॅलेसेमिया युनिट सुरू करण्यात आले आहे. यात रक्त ट्रान्सपरेशन व गोळ्या मोफत दिल्या जातात. जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून येण्यासाठी गाडीची व्यवस्था केली आहे. जेणेकरून या रूग्णांच्या उपचारात खंड पडू नये, याची काळजी घेतली जाते. काही मुलांना दत्तक घेतले आहे. त्यांना नॅक टेस्टेड रक्ताची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी थॅलेसेमिया दिनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमास प्रारंभ करण्यात येणार आहे. समाजातील दानशून व्यक्ती, संस्था यांनी अशा पालकांच्या मदतीसाठी पुढे यावे. – डॉ. सई नेमाडे