मुंबई : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग च्या तीन केसेस आदित्य ठाकरेंवर दाखल आहेत, भाजप नेते नितेश राणेंनी असा गौप्यस्फोट केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी याबाबत खुलासा न केल्यास मातोश्रीवर मोर्चा आणण्याचा इशाराही त्यांनी दिला .
नितेश राणे म्हणाले की, “एनसीपीसीआर हा लहान मुलांच्या संरक्षणासाठी बनवलेला आयोग आहे. एनसीपीसीआरने आदित्य ठाकरेंविरोधात लहान मुलांना छळण्याबाबत तीन तक्रारी दिल्या आहेत की, नाही? याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी करावा. आदित्य ठाकरे आणि लहान मुलांचा काय संबंध आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे आणि लहान मुलांसदर्भातील तीन केसेस त्यांनी दाबल्या. याचं कारण काय?” असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, “बदलापूरमध्ये घडलेल्या निर्घृण घटनेबाबत आमचं सरकार कुठलीही दयामाया न दाखवता आरोपीला फाशी व्हावी, यावर ठाम आहे. पण उद्धव ठाकरेंचं सरकार असताना त्यांच्या मुलाने लहान मुलांसदर्भात केलेल्या घाणेरड्या कृत्यांबाबत जर त्यांनी माहिती दिली नाहीत तर मी पत्रकार परिषद घेऊन एनसीपीआरच्या तिन्ही तक्रारींबाबत माहिती देईल.”
“उद्धव ठाकरे चिमुकल्या मुलीच्या बलात्काराच्या घटनेचं राजकारण करत आहे. तुमच्या घरातल्या मुलाला आधी आवरा अन्यथा लहान मुलं आणि त्यांच्या पालकांचा मोठा मोर्चा मातोश्रीवर आणेन. तसेच आम्हाला आदित्य ठाकरेंपासून संरक्षण देण्याची मागणी करेन. त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप करण्याआधी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी आपल्या घरातल्या मुलाला आवरावं,” असेही ते म्हणाले.
डॉ. पाटकर यांच्यावर संजय राऊतांचा दबाव!
“संजय राऊत भांडूपमध्ये ज्या वॉर्डमध्ये राहतात तिथला नगरसेवक भाजपचा आहे आणि ते दुसऱ्यांवर टीका करतात. महिलांवर अत्याचार, पोलिसांवर दबाव यावर बोलण्याची त्यांची नैतिकता नाही. संजय राऊत डॉ. पाटकर महिलांना छळत आहेत. आता त्या महिलेने देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्यासाठी संजय राऊत तिच्यावर दबाव टाकत आहेत,” अशी माहितीही नितेश राणेंनी यावेळी दिली.