लाडकी बहिण योजनेत होणाऱ्या खर्चावर मंत्री अदिती तटकरेंनी केला खुलासा, म्हणाल्या…

मुंबई : लाडकी बहिण योजनेवर अर्थ विभागाचा कोणताही आक्षेप नाही, असा खुलासा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केला आहे. लाडकी बहिण योजनेच्या खर्चावरून अर्थ विभागाकडून राज्य सरकारवर टीका करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. यावर आता अदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिले.

अदिती तटकरे म्हणाल्या की, “विभागाची मंत्री म्हणून जबाबदारीने सर्व प्रसारमाध्यमांना सांगू इच्छिते की, असे कोणतेही आक्षेप उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार आणि अर्थ विभागाने योजना जाहीर केल्यानंतर घेतले नाही. महिला सक्षमीकरणाचा दृष्ट्रीकोन डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन आणि योजना राबविण्यासाठी लागणाऱ्या निधीची पुर्तता करुन ही योजना सुरु केली आहे.”

“माध्यमांच्या तथ्थहिन बातम्यांमुळे या योजनेबाबत राज्यातील महिला भगिनींमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. योजनेबाबत आपल्याला माहिती हवी असल्यास विभागाची मंत्री म्हणुन मी सदैव तत्पर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली असलेले राज्य सरकार ही योजना यशस्वी करुन सर्व लाभार्थी महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळवून देत महिला सक्षमीकरणासाठी घेतलेला वसा पुर्णत्वास नेतील,” असे आश्वासनही अदिती तटकरेंनी दिले आहे.