VIDEO : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जळगावकर सज्ज, भक्तांचे डोळे पाणावले

जळगाव : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी जळगावकर सज्ज झाले आहेत.

गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जळगाव शहरात मोठ्या थाटात गणपती विसर्जन हा पारंपारिक आणि मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. जळगावातील मानाच्या मनपा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. प्रभात बँड पथकाच्या वादनात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या ही विसर्जन मिरवणूक टॉवर चौकात पोहोचली आहे. यावेळी ढोल-ताशांच्या तालावर माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी ठेका धरला.

तत्पूर्वी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली. या प्रसंगी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख वा कर्मचारी उपस्थित होते.

विसर्जन मिरवणुकींवर सीसीटीव्हींची नजर
जळगाव शहरात विसर्जन मार्गावर ८३ सीसीटीव्ही कॅमेरे व ५ ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जाणार आहे. भुसावळ येथील जामा मशिद या परिसरात नगरपालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. रावेर येथे मुख्य मिरवणुकीच्या मार्गात व तसेच संवेदनशील परिसातत पूर्वीपासूनच कॅमेरे लावण्यात आले आहेत.