लाहोरा जिल्हा परिषद मुलींची शाळा : प्रवेश कायमस्वरूपी लक्षात राहावा यासाठी राबविला अनोखा उपक्रम

लोहारा :  येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळेत शनिवार, १५ जून रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश सोहळा “न भूतो न भविष्यती “अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रवेश सोहळ्याचे ड्रोन द्वारे चित्रीकरण करण्यात आले.

शाळेच्या पहिल्या दिवशी वाजत गाजत शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ व औक्षण करून सत्कार करण्यात आला.  कुंकवाचे पाणी केलेल्या ताटात पाय ठेऊन पायाचा ठसा सफेद कागदावर घेऊन तो विद्यार्थिनींना शाळा प्रवेशाची आठवण कायमस्वरूपी राहावी यासाठी  संग्रही देण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार दिपक पवार यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष प्रल्हाद चौधरी, सदस्य प्रकाश सोनवणे, गजानन सरोदे, सोनाली तेली, मुख्याध्यापक विजयसिंह राजपूत, सर्व  शिक्षकांनी विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक पवार , उपाध्यक्ष प्रल्हाद चौधरी व सदस्य तसेच शिक्षक वृंद व आशा स्वयंसेविका सुनिता चौधरी, आशा कोळी,सरला सुतार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व  विद्यार्थीनिना अध्यक्ष दीपक पवार यांच्याकडून मिठाई चे वाटप करण्यात आले.  सूत्रसंचालन विलास निकम यांनी केले तर आभार कृष्णा तपोने यांनी मानले. शाळा प्रवेशोत्सव यशस्वितेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.