लेक लाडकी योजनेचा निधी वितरित ; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

लेक लाडकी योजना: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लेक लाडकी योजनेअंतर्गत पिवळया व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती दिली.

ही योजना दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील, तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.

या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जाईल. मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे (वय १८ वर्षे) पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये या प्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.याबाबत जिल्हा स्तरावर जिल्हा निहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करुन १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येणार आहे.