लोकसभा निवडणुकीचा बिगुल आज वाजणार; मविआ चा जागावाटपाचा तिढा कायम

Lok Sabha Election 2024: आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा  जाहीर करतील. असे असताना देखील राज्यामध्ये महाविकास आघाडी  जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. काही जागांवर अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटाचा  दावा असल्याने जागावाटपाचा तिढा पूर्ण झालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील नेते काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शरद पवारांच्या  सिल्वर ओक या निवासस्थानी जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी पोहोचले आहेत. .

काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला 
महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून कोणताही तोडगा न निघाल्याने आज पुन्हा महाविकास आघाडीचे नेते  शरद पवारांशी चर्चा करणार  आहे. दरम्यान, ठाकरे गट राज्यांमध्ये 23 जागा लढवण्यावर अजूनही ठाम असून यामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाची मागणी आणि वंचितच्या प्रस्तावावरती चर्चा होणार आहे. वंचितला महाविकास आघाडीने चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीमध्ये कोणता तोडगा काढला जातो याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दुसरीकडे, काही जागांवर अजूनही दोन्ही पक्षांचा दावा कायम आहे. यामध्ये सांगली आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सांगली लोकसभेसाठी शिवसेनेने दावा केला असला तरी, काँग्रेस नाराज झाला आहे.