लोकसभा निवडणूकीनंतर बहिणी झाल्या लाडक्या ; ‘या’ खासदाराने केला आरोप

जळगाव :  खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर जोरदार ताशेरे ओढले. ज्या बहिणी लोकसभेपर्यंत लाडक्या नव्हत्या त्या लोकसभेनंतर लाडक्या झाल्या तसेच शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंनी वाढवलेला पक्ष, राष्ट्रवादी हा पवार साहेबांनी उभा केलेला पक्ष फोडून चिन्ह हिसकवून नेण्याचे काम अदृश्य शक्ती व भाजपाने केले असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित महिला मेळाव्यात बोलत होत्या.

याप्रसंगी  माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, श्रीराम पाटील, रोहिणी खडसे, माजी आमदार राजू दादा देशमुख, माजी आमदार अरुण पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, इंदिरा पाटील, रवींद्र पाटील, श्रीराम पाटील, विशाल देवकर, प्रमोद पाटील, वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते.

जळगाव व पवार साहेब यांचे ऋणानुबंध अनेक वर्षापासून असल्याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करुन दिली.बहिणींना निधी मिळणार आहे म्हणून सरकारचे आभार मानले. चांगल्याला चांगले म्हटलेच पाहिजे असेही त्या म्हणाल्या. अशा दडपशाही सरकारला हद्दपार करावे. लोकसभेपर्यंत बहिणी लाडकी नव्हती मात्र लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या असल्याचा टोला खासदार सुळे यांनी लगावला.

आता शेतीवर टॅक्स आहे पूर्वी तो नव्हता. शेतीच्या बियाण्यांवर, खतांवर मोठ्या प्रमाणात टॅक्स आहे. आपले महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यावर तो टॅक्स शून्य करण्यात येईल असे आश्वासन दिले. या सरकारने 27 हजार कोटी मेट्रोसाठी दिले आहे. आमचा मेट्रोला विरोध नाही मात्र गरीब शेतकऱ्यांना हे सरकार का मदत देत नाही म्हणून त्यांनी सरकारचा निषेध केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर विकासाबरोबरच शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. आशा वर्कर यांना पगार मिळाला नाही तर आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू जर यावर तोडगा निघाला नाही तर एक आठवड्यानंतर उपोषणाला बसू असे त्यांनी जाहिर केले.