लोकसभेत घुसखोरीसाठी तयार होत्या दोन योजना, मुख्य आरोपीची धक्कादायक माहिती

नवी दिल्ली: लोकसभेत घुसखोरी करण्यासाठी प्लॅन ‘ए’ आणि प्लॅन ‘बी’ अशा दोन योजना आरोपींनी तयार केल्या होत्या. नियोजन केल्याप्रमाणे पहिली योजना यशस्वी ठरली नाही, तर पर्यायी योजना राबविण्याची तयारी होती. घुसखोरी प्रकरणातील मुख्य आरोपी ललित झा याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून ही धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली.ललित झा याने पोलिसांना सांगितले की,

ठरल्याप्रमाणे नीलम आणि अमोल संसदेच्या जवळ पोहोचू शकले नाहीत, तर महेश आणि कैलासला दुसऱ्या बाजूने संसदेच्या आवारात पाठविण्याची तयारी केली होती. तिथून ते स्मोक कँडल फोडून माध्यमकर्मीसमोर घोषणाबाजी करणार होते, असा प्लॅन बी होता. ललितने सांगितले की, महेश आणि कैलास गुरुग्राममधील विकीच्या घरी पोहोचू शकले नाही, त्यामळे आम्ही प्लॅन ए प्रमाणे अमोल आणि नीलमला मोहिमेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही परिस्थितीत त्या दोघांनी आपले ठरलेले काम पूर्ण करावे, असे निर्देश त्या दोघांना दिले होते. गुरुग्राममधील विकीच्या घरी हे सर्व लोक आदल्या दिवशी भेटले होते. १३ डिसेंबर रोजी संसदेतघुसखोरी झाल्यानंतर दोन दिवसांपासून दिल्ली पोलिस सहाव्या आरोपीचा शोध घेत होते.

ललित झा याने बुधवारी रात्री दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. संसदेच्या बाहेर तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर ललित झा फरार झाला होता. नळकांड्या फोडल्याचा व्हिडीओ बनवून ललितने घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर ललितने बसच्या माध्यमातून राजस्थामधील नागौर शहर गाठले. तिथे त्याने दोन मित्रांची भेट घेतली आणि एका हॉटेलमध्ये वास्तव्य केले. त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ललित दिल्लीला आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.