वंदे मातरम रेल्वे, विमानतळ, नवीन एमआयडीसी, रस्त्यांसाठी पाठपुरावा

जळगाव: शहराच्या विकासासाठी वर्षभरात 276  कोटींचा निधी आणला आहे. त्यातून येत्या वर्षभरात विविध विकास कामांसह शहरातील रस्त्यांची कामे होणार आहेत. यासोबत मुंबई व पुण्याकडे जाण्यासाठी वंदे भारत रेल्वे, नवीन एमआयडीसी, विमानसेवा सुरू करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी ‌‘तरुण भारत लाईव्ह’शी बोलताना दिली.

तरुण भारत कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या गणेशाची आरती आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याशी ‌‘तरुण भारत लाईव्ह’तर्फे संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

लोकमान्य टिळकांनी जो गणेशोत्सव सुरू केला त्यांना खरोखरच नमन करतो, त्याचा उपयोग राष्ट्रहितासाठी होत आहे. इंग्रजांविरूद्ध बंड पुकारायचे होते त्या काळात इंग्रज गर्दी होऊ देत नव्हते. पण गणरायांच्या माध्यमातून, मंडळच्या माध्यमातनू लोक एकत्रित आली.सर्व जातीपंथाचे लोक एकत्र आलेत आणि ही विचारधारा वाढत गेली. हे एक धार्मिक कार्य आहे. यामाध्यमातूनही विकास कार्य करत असतांना सर्व धर्मपंथांचे आशीर्वाद घेऊन मी या शहराचा एक सेवक म्हणून पंतप्रधान मोदी साहेबांचा एक आदर्श घेतो. ते नेहमी सागतात की ‌‘ते’ जनतेचे सेवक आहेत. आम्ही कार्यकर्ते म्हणून जनतेचे सेवक आहोत. आम्हाला जनतेने आशीर्वाद दिलेत ते सेवा करण्यासाठी दिलेत. म्हणून आमचं कर्तव्य आहे. आम्ही म्हणणार नाही की आम्ही विकास केला खुप कामे झालीत. पण प्रामाणिकपणे जे जे होईल ते ते करण्याचा प्रयत्न केला.

जळगाव महापालिका

जळगाव महापालिकेच्या कर्ज मुक्ततेबाबत सांगताना ते म्हणाले की, लोकांनी भरलेला कर हा हुडकोच्या कर्जात जात होता. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचेही पगार तीन तीन महिने होत नव्हते. याची मला नगरसेवक असतांना जाणिव होती. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना व ना.गिरीश महाजन यांनी विनंती केली. आम्ही तीन वेळेस दिल्लीला गेलो. 450 कोटींचे सेटलमेंट 250 कोटीत केले. राज्य सरकारने एका वेळेस 250 कोटी हुडकोला भरले आणि महापालिकेला कर्जमुक्त केले. महालिकेला देण्यात येणाऱ्या जीएसटीतील निधीतून ते वर्ग केलेत. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस असतांना विकासासाठी निधी आणला. ना. गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना. अनिल पाटील यांच्या माध्यमातूनही निधी आणला. या सर्वांच्या व जनतेच्या आशीर्वादाने आम्ही जळगाव शहराच्या विकासासाठी उत्तराई होण्याचा प्रयत्न केला आहे.

मूलभूत सुविधा देण्यावर भर

जनतेची जळगाव शहराला सिंगापूर करा अशी मागणी नाही. किमान मुलभूत गरजा सुविधा, गटार, रस्ते, पाणी, पथदिवे या सुविधा मिळाव्यात एवढीच अपेक्ष्ाा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव शहरासाठी अमृत योजना, भुयारी गटारी योजना दिली. त्यासाठी मोठा निधी दिला आहे. अमृतचे आतापर्यत 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. काही भागात अमृत योजनेतून पाणी पुरवठाही सुरू झालेला आहे. भुयारी गटारीच्या एका फेजचे काम पूर्ण झाले आहे. दोन  फेजचे काम बाकी आहे.

रस्त्यांविषयी जनता नाराज

शहरातील रस्त्याविषयी जनतेमध्य तिव्र नाराजी आहे.  कारण ते कर भरतात. शहराच्या अनेक भागात व वाढीव भागात रस्तेच झालेले नाहीत. त्याबाबत दिलगीरी व्यक्त करतो. रस्ते का झाले नाहीत हे सांगत नाही त्यात राजकीय भाग आहे. त्यात आता जात नाही. परंतु आता महापालिकेची गाडी रूळावर आली आहे. वर्षभरात बरीच विकासाची कामे मार्गी लागतील.

वंदे भारत रेल्वेसाठी प्रस्ताव

भुसावळहून मुंबई व पुणे या शहरांसाठी वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्री खासदार दानवे यांना दिला आहे. या दोन्ही शहरात जळगावहून जाणारे प्रवासी मोठे आहेत. यासोबतच विमानसेवा सुरू करण्यासाठीही पाठपुरावा सुरू आहे. ही सेवा महिनाभरात सुरू होईल. एकूण जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी  राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

नवीन एमआयडीसीचा प्रस्ताव

जळगाव शहरात नवीन एमआयडीसी यावी अशी जनतेची आणि आमची इच्छा आहे. त्याबाबत विधानसभेतही हा विषय मांडला असून उद्योग मंत्र्यांनीही त्यास सकारात्मता दर्शविली आहे. त्यानुसार लवकरच नवीन एमआयडीसी होईल आणि अनेकांना रोजगार मिळेल. यातून जनतेच्या मनातल सरकार आणल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, ना. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्नशिल आहे.

एका वर्षात 276 कोटीचा निधी

एका वर्षात आम्ही सुमारे 276 कोटींचा निधी आणला आहे. रस्त्यांची कामे सुरू असून काही रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. येत्या सहा महिन्यात या रस्त्याच्या कामाला सुरूवात होईल. ही कामे पूर्ण होताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना बोलावून त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात येईल. शिवाजी नगरचा पूल, पिंप्राळा पुल, 100 कोटी, 85 कोटीतील काही कामांचे उद्घाटन तर काही कामांचे भूमिपूजन करण्यात येईल.