वडिलांसोबत ज्ञानेश्वरी शाळेसाठी निघाली, पण वाटेत मृत्यूने गाठलं, क्षणात झालं होत्याचं नव्हतं

पहूर ता.जामनेर : भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरने सायकलला मागून जबर धडक दिल्याने शाळेत निघालेल्या ११ वर्षीय शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पहूर येथील वाघूर नदीच्या पूलावर आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वरी शंकर भामेरे (११) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लेलेनगरमधील रहिवासी वा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा पत्रकार शंकर रंगनाथ भामेरे हे सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आपली मुलगी ज्ञानेश्वरी हिला सायकलवर शाळेत सोडण्यासाठी निघाले होते. यावेळी भरधाव आयशर गाडी (क्र.एम एच २३ ए यु ५५८२) ने मागून जबर धडक दिली. या अपघातात दोघेही सायकल वरून खाली रस्त्यावर फेकेले गेले.

घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस स्टेशनचे पी.आय सचिन सानप आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. गावातील नागरीकांच्या सहकार्याने जखमी शंकर भामेरे व ज्ञानेश्वरी हिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, ज्ञानेश्वरीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यावेळी गावकऱ्यांनी रूग्णालयात एकच गर्दी केली. ज्ञानेश्वरीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून प्रेत नातलगांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी ज्ञानेश्वरीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, ज्ञानेश्वरी ही शाळेत अत्यंत हूशार मुलगी होती. विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिने प्राविण्य मिळविले होते. आज देखील ती विवेकानद प्रतिष्ठान जळगाव येथे कवी संमेलनात सहभागी होण्यासाठी जात होती. मात्र दुर्दैवाने तीचा अपघातात मृत्यू झाला.

अपघाताला ठेकेदार कारणीभूत?
पहूर वाघुर पुलाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूंनी खड्डे पडले असल्याने याठिकाणी बरेच अपघात होत आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ता प्राधिकरणाचे याकामी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या अपघाताला कारणीभूत असलेल्या रस्ता ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या कारणास्तव सर्व गावातील नागरिकांनी ज्या ठिकाणी अपघात घडला, त्या वाघुर पुलावर ज्ञानेश्वरीला श्रध्दांजली वाहण्यासाठी एकत्र जमले. त्यामुळे रस्तारोको होऊन वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. यावेळी रोडवरच माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, माजी जि.प. कृषी सभापती प्रदीप लोढा, माजी पं. स. सभापती बाबुराव घोंगडे, शरद बेलपत्रे , भा. रा. काँ. तालुका अध्यक्ष शंकर राजपूत , धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष रामेश्वर पाटील, ग्रा. प. सदस्य महेश पाटील यांनी यावेळी शोक संवेदना व्यक्त करीत प्रशासनाच्या हलगर्जी पणावर ताशेरे ओढले.

याप्रसंगी पहूरपेठ सरपंच अब्बू तडवी, उपसरपंच शरद पांढरे , पहूर कसबेचे सरपंच शंकर जाधव , उपसरपंच राजू जाधव , माजी सरपंच लक्ष्मण गोरे , ग्रा.प. सदस्य सोनु बावस्कर , सकल मराठा समाजाचे संतोष पाटील, समाधान पाटील, वासूदेव घोंगडे , शंकर घोंगडे, ईश्वर देशमुख, गजानन सोनार , संजय सोनार , गणेश सोनार शांताराम गोंधनखेडे, तुषार बनकर , चेतन रोकडे, राहूल ढेंगाळे, शाम कुमावत ,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण कुमावत, गणेश पांढरे ,शांताराम लाठे, मनोज जोशी, किरण जाधव, संतोष पांढरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पी आय सचिन सानप सह संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.