वर्षा बंगल्यावर झाली बैठक…अन् विजय शिवतारे बॅकफूटवर? बैठकीत काय घडलं?

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवारांविरुद्ध निवडणुकीत बंड पुकारणारे व काही झालं तरी अजित पवारांना पराभूत करणारच असा ठाम निर्धार केलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे आता बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद मिटला असून त्यांच्यात मनोमिलन झाल्याची माहिती समोर येत आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विजय शिवतारेंची विशेष बैठक पार पडली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे विजय शिवतारेंचं बंड थंड झाल्याची चर्चा सुरू आहे. या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन शिवतारे आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडणार आहेत. त्यामुळे बारामती मतदारसंघातील वाद मिटल्याची चिन्ह आहेत.बुधवारी वर्षा बंगवल्यावर महायुतीतील या तीनही प्रमुख नेत्यांची शिवतारेंसोबत बैठक झाली. बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते.