जळगाव : मित्रांसोबत रंगाची उधळन करत धुलीवंदन उत्सव उत्साहाने साजरा केला. त्यानंतर दुपारी मित्रांसोबत वाघूर धरणात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमवार, २५ रोजी दुपारी ही घटना घडली. रोहित कैलास पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर शोध मोहिमेत चोवीस तासांनी मंगळवार, २६ रोजी दुपारी त्याचा मृतदेह हाती लागला. सोमवारी धुलीवंदन उत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला. रोहित यानेही गावात मित्रांसोबत रंगाची उधळन करत आनंद साजरा केला. सारे मित्र रंगात न्हावून निघाले.
त्यानंतर दुपारी हे तरुण पोहण्यासाठी वाघूर धरणाकडे मार्गस्थ झाले. रोहितही या मित्रांसोबत गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने रोहित हा बुडाला. प्रकार लक्षात येताच सोबतच्या तरुणांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तपास लागला नाही. ही वार्ता गावात धडकल्यानंतर अनेक तरुणांनी धरणाकडे धाव घेतली. दुपारपासून संध्याकाळपर्यत शोध मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर अंधार झाल्याने शोध मोहिम थांबविण्यात आली. चटई कंपनीत होता कामाला रोहित हा कुसुंबा येथे आई, मोठाभाऊ यांच्यासह वास्तव्यास होता. एमआयडीसीतील चटई कंपनीत कामाला जावून तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत होता. कोणाच्याही कामात मदतीला धावून जाण्याचा रोहित याचा स्वभाव होता. त्याच्या अकस्मात मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल गफार तडवी करीत आहेत.
२४ तासांच्या शोध मोहिमेला यश
मंगळवारी पुन्हा सकाळपासून धरणात तरुणाचा शोध घेण्याला सुरुवात करण्यात आली. काही पट्टीच्या पोहणाऱ्यांना याठिकाणी पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नाअंती दुपारी तरुणाचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह हलविला. तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मृत घोषित केले. रुग्णालयात कुसुंबा येथील तरुणांसह नातेवाईक, स्नेहीजणांची गर्दी होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.
एमआयडीसी पोलीसही सोबत रवाना झाले.