पालघर : वाढवण बंदरामुळे पुढची ५० वर्षे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहणार, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आजचा दिवस हा इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे. मुंबई बंदर आणि जेएनपीटी बंदरापेक्षा तिप्पट मोठे वाढवण बंदर तयार होत आहे. या वाढवण बंदरामुळे पुढचे ५० वर्ष महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिल. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शक्य झाले. ८० च्या दशकात वाढवण बंदराची संकल्पना मांडण्यात आली. परंतू, १९९१ मध्ये सुप्रिम कोर्टाने डहाणूची एक सूचना काढली, समिती तयार केली आणि जन्माच्या आधीच वाढवण बंदराचा मृत्यू झाला. त्यानंतर हे बंदर बनूच शकणार नाही असे सगळे म्हणत होते. परंतू, २०१४ मध्ये मोदी सरकारच्या आशीर्वादाने आम्ही वाढवण बंदराचा मुद्दा पुन्हा जिवंत केला आणि आज वाढवण बंदराची पायाभरणी हस्ते होत आहे. पुढच्या २०० वर्षांपर्यंत या वाढवण बंदरामुळे पंतप्रधान मोदींचे नाव इतिहासात नोंदले जाईल. यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे.”
ते पुढे म्हणाले की, “येणाऱ्या दिवसांत वसई, विरार, पालघरच्या दिशेनेच मुंबई वाढणार आहे. या वाढवण बंदरासोबतच जर याठिकाणी तिसरं विमानतळ तयार झालं तर आम्ही मुंबईला नवं रूप देऊ. मच्छीमाराच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी इथल्या मच्छिमार आणि आदिवासी लोकांनाच प्रशिक्षण देऊन त्यांनाच नोकऱ्या दिल्या जातील. याठिकाणी १ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून इथले मच्छीमार, ओबीसी आणि आदिवासींनाच त्या देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. लवकरच या सर्वांना चांगल्या नोकऱ्या मिळणार आहेत,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.