नवी दिल्ली: स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आलेल्या ‘समर’ हवाई क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेची भारतीय वायुदलाने यशस्वी चाचणी घेतली. रशियाच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या जुन्या यंत्रणेचा वापर करून वायुदलाने ‘सरफेस टू एअर मिसाईल फॉर अॅश्युअर्ड रीटालिएशन’ (समर) यंत्रणा विकसित केली आहे.समर यंत्रणेते दोन प्रक्षेपण मंचांचा समावेश आहे. धोक्याचे आकलन करून परिस्थितीनुसार यातून दोन किंवा एक अथवा एकाचवेळी दोन क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात, असे अधिकान्यांनी सांगितले.
या क्षेपणास्त्र प्रणालीची कामगिरी यापूर्वीच वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी आणि वायुदलाचे उपप्रमुख व्हाईस चीफ एअर मार्शल ए. पी. सिंह यांनी पाहिली होती.वायुदलाने सूर्यलंका तळावर सुरू असलेल्या अस्त्रशक्ती-२०२३ या सरावादरम्यान ‘समर’ या हवाई संरक्षण यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतली. वायुदलाच्या मेन्टेनन्स कमांडच्या अंतर्गत ‘समर’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे, असे वायुदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. जमिनीवरून हवेत हल्ला करणाऱ्या शस्त्रास्त्र प्रणालीची चाचणी घेण्यासाठी आणि त्याच्या परिचालन चाचण्यांसाठी प्रथमच समरने सरावात भाग घेतला. क्षेपणास्त्र प्रणालीने वेगवेगळ्या परिस्थितीत प्रक्षेपण उद्दिष्ट यशस्वीरीत्या साध्य केले. ही यंत्रणा २ ते २.५ मॅक वेगाने येणाऱ्या क्षेपणास्त्रांसह हवाई धोक्यांचा सामना करू शकते.