वाहन सुसाट चालवताय? आता सावध व्हा, अन्यथा…

मुंबई : विना परवाना, मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव गेल्याचे आपण वाचले असलेच. आता अश्या वाहन चालकांवर काय करायला हवे. यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

गृह विभागाच्या यासंदर्भात सार्वजनिक रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणे हा अजामिनपात्र गुन्हा करण्याबाबतच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यात प्रवाशांचा होणारा मृत्यू, यासाठी वाहनाचालकांविरुद्ध प्रभावी कारवाई होण्यासाठी कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करावी. विनापरवाना वाहन चालविणारे तसेच मद्यपी वाहनचालकांना त्याच्या कक्षेत आणावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग यावरील अपघात रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपायोजनांची माहिती घेतली. मुंबई- पुणे महामार्गावर असलेल्या उतारावरील ठिकाणी अपघात टाळण्यासाठी सुचना फलकांसोबतच रंब्लर बसविणे यासारख्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी यावेळी दिले.