जळगाव : येथील विकास दूध फेडरेशन येथील दूध पावडर नियोजित स्थळी न नेता ट्रकचालक व क्लीनर यांनी परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यातून 74 लाख 45 हजार रुपयाचा अपहर प्रकरणी मंगळवार ११ जून रोजी मध्यरात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील विकास दूध फेडरेशनमध्ये दुधापासून विविध पदार्थ बनविले जातात. हे पदार्थ शहरासह इतर राज्यात देखील वितरित केले जातात. यात दूध पावडर देखील विक्री केली जाते. बुधवार, ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ट्रक क्रमांक (आरजे ११ जीबी ९५७९)मध्ये लखनौ येथे नेण्यासाठी विकास दूध फेडरेशनची दूध पावडर भरण्यात आली. हा ट्रक ट्रकचालक फिरोज सरजूद्दीन (रा. आग्रा, उत्तर प्रदेश)आणि क्लीनर रसतम कमलेश बघेल (रा. चतुर, राज्य मध्यप्रदेश) या दोघाकडे सुपूर्द करण्यात आला. ट्रकचालक व क्लिनर यांनी दूध पावडरने भरलेला ट्रक लखनौ येथे निश्चित स्थळी न नेता त्याची परस्पर विल्हेवाट लावली. त्यांनी दुधपावडरच्या ट्रकचा अपहार केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात दोघां विरोधात 74 लाख 45 हजाराचा अपहार केल्याची तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीनुसार मंगळवार ११ जून रोजी मध्यरात्री १ वाजता दोन जणांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भवारी हे करीत आहेत.