विजयाची कामना करणारा समाज

विजयादशमी हे विजयाचे पर्व आहे. प्राचीन काळापासून आमचा देश हा विजयाची कामना करणारा देश आहे. केवळ कामना नाही तर त्यासाठी साधना करणारा, पराक्रमाची शर्थ करणारा, प्रसंगी प्राणांचे बलिदान देणारा समाज आहे. आमच्या समाजाने नेहमीच धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे, याचा विचार करीत जे श्रेष्ठ आहे, जे चांगले आहे, जे देशाच्या, समाजाच्या, मानव जातीच्या हितासाठीचे आहे यासाठी जीवनाला तृणवत मानून आपल्या प्राणांचे बलिदान केलेले आहे. म्हणूनच आमच्या देशाला बलिदानाचीसुद्धा इतकी मोठी परंपरा आहे. या देशावर कधी शकांचे आक‘मण झाले. हे शक अतिशय पराक्रमी होते. मानव जातीचे शत्रू होते. अशा शकांशी लढताना कधी काही काळ समाजाला माघार घ्यावी लागली असेल, परंतु त्यानंतर मात्र पुन्हा एकदा याच भूमीतून शालिवाहनासारखे योद्धे निर्माण झाले,संघटक निर्माण झाले; ज्यांनी केवळ आपल्या युद्धचातुर्याच्या भरवशावरच नव्हे, तर आपल्या संघटन चातुर्याच्या भरवशावर इथल्या सामान्य माणसांमध्ये शकांना परास्त करण्याची प्रेरणा निर्माण केली आणि त्यातून एक मोठा विजय साकारला गेला.

शकांचे आक्रमण झाले म्हणून आमचा समाज भीतीने कधी शक बनला नाही. त्याने आपला धर्म कधीही सोडला नाही. कधी या देशावर हुणांचे आक्रमण झाले. हूणसुद्धा तेवढेच पराक्रमी आणि क्रूर होते. हुणांच्या आक्रमणात अनेकानेक गणराज्यांचा पाडाव झाला. पुन्हा याच भूमीतून यशोधर्मासारखे राजे उत्पन्न झाले. ज्यांनी हुणांचे आक्रमण हे संपूर्ण राष्ट्रावरील आक्रमण आहे, हे ओळखून आपली सेना संघटित करून हुणांचा पराभव केला. ज्याच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्याने सर्व जगाला जिंकले होते असा सिकंदर त्याचेही आक्रमण या देशावर झाले. छोट्या छोट्या गणराज्यांना जिंकणारा सिकंदर ज्या वेळेला हे गणराज्य एकत्रित व्हायला लागले आणि त्याच्यासमोर त्याला तिखट प्रतिकार अनुभवायला मिळायला लागला तर त्यावेळेला तो सिकंदर याच भूमीवर आपले गुडघे टेकवून चालता झाला. त्याला भारतज्जेता असे ब्रीद मिरविता आले नाही.

संपूर्ण जगाला आपल्या अत्याचारांनी, दहशतीने पादाक‘ांत करण्याचा प्रयत्न करणारी इस्लामची विजयी तलवार याच भूमीमध्ये गाडली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांचे तुलनेने अगदी छोटेसे राज्य बुडवायला स्वत: औरंगजेबाला यावे लागले. तसे पाहिले तर औरंगजेब भारतातल्या इतर प्रांतांवर स्वारी करायला कधीही गेला नव्हता. त्याचे सरदारच वेगवेगळे प्रांत जिंकायचे आणि औरंगजेबाच्या साम्राज्याशी जोडायचे. परंतु, शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे काही एका राजाच्या महत्त्वाकांक्षेतून उभारलेले स्वराज्य नाही, हे औरंगजेबाने ओळखले होते. ही स्वातंत्र्याची ठिणगी आहे, हे तो जाणून होता. त्यामुळे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हे स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी महाराष्ट्रात आला. परंतु ज्यावेळेस महाराष्ट्राला कोणीही नेता नव्हता अशा काळामध्ये महाराष्ट्र औरंगजेबासार‘या बलाढ्य शत्रूशी लढत राहिला. शेवटी या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात खोदली गेली. महाराष्ट्र पराभूत झाला नाही. औरंगजेब मराठ्यांचे राज्य संपवू शकला नाही; उलट ते पुन्हा एकदा उभारले गेले आणि त्यांनी अटकेपार झेंडे रोवले. त्यानंतर या देशावर एक धूर्त, मुत्सद्दी आणि संपूर्ण जगावर ज्यांचे राज्य होते असे इंग‘ज भारतामध्ये आले.

त्यांनी या देशाला गुलाम करण्याचा प्रयत्न केला. सातत्याने शेकडो वर्षेपर्यंत विविध आक्रमकांशी झुंजणारा समाज दीडशे वर्षेपर्यंत या इंग्रजांशी झुंजला आणि त्यानंतर एक दिवस त्यांना भारत सोडून जावे लागले. हा संपूर्ण 2000 वर्षांचा इतिहास आहे. हा इतिहास सांगतो की, आमच्या समाजाने कोणाचीही गुलामगिरी हसत हसत स्वीकारलेली नाही. आम्ही कधी शक झालो नाही, आम्ही कधी हूण झालो नाही. आम्ही कधी यवन झालो नाही. आम्ही कधी इस्लाममुळे धर्मांतरित झालो नाही तर कधी इंग‘जांमुळे ख्रिश्चन झालो नाही. आमच्या देशातील समाजाने आपला धर्म, आपली ओळख, आपली परंपरा या शाबूत ठेवल्या.

जे कधी इंग्रज करू शकले नाही ते आक्रमण आता पाश्चिमात्य संस्कृतीचे भारतावरील आक्रमण आहे. इस्लामच्या आक्रमणामध्ये जे धर्मांतरण केले जायचे ते आज विविध मार्गांनी आणि लव्ह जिहादसारख्या छुप्या रस्त्यांनी सुरू आहे. औद्योगीकरणामुळे आता सर्वांनाच घाई आहे. आमचे सणवार, उत्सव हे सुद्धा मर्यादित स्वरूपात साजरे होऊ लागलेले आहे. पूर्वीच्या काळी शेतीवाडी करणारा, सामान्य उद्योग करणारा समाज जगाला अनेक गोष्टी निर्यात करायचा. ज्ञान आणि विज्ञान शिकायला जगातील अनेक देशातून लोक भारतामध्ये यायचे. जगाला भारताचे आकर्षण होते. भारताची मोहिनी जगावर होती. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये या देशावर ज्या लोकांचे राज्य होते, ज्यांची सत्ता होती त्या लोकांना मात्र पश्चिमी देशांचे आकर्षण होते. जे विदेशी आहे ते चांगले. आम्ही थोडे मागासलेले आहोत, अशा पद्धतीचा समज आमच्या राज्यकर्त्यांचा होता. राज्यकर्ते ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने समाज अनेक वेळा जात असतो. त्यामुळे समाजामध्ये आमचे ते मागासलेले आणि इतरांचे ते चांगले अशा पद्धतीची भावना निर्माण झाली.

परंतु अशा पद्धतीची स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगणारी भावना असणारा समाज विजयशाली होऊ शकणार नाही. त्यासाठी आमच्या जवळ जे आहे त्याचा योग्य शोध आणि बोध घेण्याची आवश्यकता आहे. आमच्यातील अनेक चांगल्या गोष्टींच्या आधारावरच आम्ही इतकी वर्षे जिवंत आहोत. येणार्‍या काळामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण असेल, पाश्चिमात्य वस्तूंचे आक्रमण असेल, समाजमाध्यम, मोबाईल, इंटरनेट यामुळे कमी होत चाललेली सामाजिक प्रवृत्ती असेल, एकलकोंडा होत जाणारा माणूस असेल, अहिंदू समाजाचे आक्रमण असेल, कुटुंब व्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या समस्या असेल, युवा पिढीमध्ये निर्माण झालेली भौतिकता असेल या सर्वांवरच काम करण्याची आवश्यकता आहे व विजयी होण्याची आवश्यकता आहे. आमच्या देशाचा इतिहास हा विजयाचा इतिहास आहे. आम्ही आमच्या समाजातील चांगल्या लोकांना एकत्र आणून या सर्व समस्यांमधून मार्ग काढू आणि पुन्हा एकदा विजयी होऊ, अशा पद्धतीचे चिंतन विजयासाठी आवश्यक आहे.
विजयादशमी विजयाची कामनासमाज

– अमोल पुसदकर