काही दिवसांपूर्वी अजित पवारांविरुद्ध निवडणुकीत बंड पुकारणारे व काही झालं तरी अजित पवारांना पराभूत करणारच असा ठाम निर्धार केलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे आता बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही, अशी भूमिका विजय शिवतारे यांनी घेतली होती. अजित पवार यांनी आपल्याला जाहीर आव्हान देऊन निवडणुकीत पाडण्याची भाषा केली होती, त्यामुळे त्यांच्या विरोधात उभं राहणार असल्याचं शिवतारे यांनी जाहीर केलं होतं.
वेळ पडली तर नरेंद्र मोदी विचार मंच स्थापन करु आणि बारामतीमधून उभं राहू, असं शिवतारे म्हणाले होते. परंतु अजित पवारांचा प्रचार करणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढल्याची माहिती असून ते आता बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.