राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होत असताना भाजपचा बडा नेता पक्ष सोडत आहे. आता ते काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिशुपाल पटलेंना काँग्रेसमध्ये येण्यासाठी तयार केले आहेत. त्यांना तुमसर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली जाणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस नागपूरात तळ ठोकून आहेत. ते विविध भागात जाऊन सामान्य नागरिकांच्या घरी जाऊन भेट घेत आहे. गुरुवारी त्यांनी ३० परिवाराच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्याचवेळी विदर्भातील बडा नेता भाजपला सोडचिठ्ठी देत आहे. हा नेता भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. भंडारा-गोंदियाचे भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा पक्षप्रवेश मुंबईत होत आहे. वरिष्ठ नेत्यांकडून झालेले दुर्लक्ष आणि पक्षाकडून सुरू असलेल्या अवहेलना मुळे ते भाजपमधून बाहेर पडलेले आहेत. शिशुपाल पटले यांचा काँग्रेस प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का आहे.
पोवार समाजातील महत्वाचे नेते
काही दिवसांपूर्वी शिशुपाल पटले यांनी भाजपच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली नव्हती. त्यांनी राजीनामा दिल्यावर भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आता शिशूपाल पटले हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर होत असताना पोवार समाजातील महत्वाचे नेते असलेले पटले पक्ष सोडत असल्यामुळे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. २००४ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना पराभूत केले होते.
शिशुपाल पटले यांची राजकीय ताकद
शिशुपाल पटले हे पोवार समाजाचे नेते आहेत. त्यांची राजकीय ताकद मोठी आहे. भंडार गोंदीया मतदार संघात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते भाजप सोबत एकनिष्ठ राहिले होते. परंतु वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना डावलले गेले. त्यांना पक्षीय कार्यक्रमात न बोलावणे, कार्यक्रमांच्या पत्रिकेत त्यांचे नाव न टाकणे, व्यासपीठावर स्थान न देणे, भाषण करण्याची संधी न देणे, असे प्रकार पटले यांच्यासोबत झाले. त्यामुळे ते भाजपवर नाराज झाले. पक्षामध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे, असा आरोप करत त्यांनी २५ जुलै रोजी भाजपच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला होता.