विद्युत पुरवठा चालू बंद का करतो ? जळगावात महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

जळगाव : विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून एकाने कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करत, कार्यालयावर दगडफेक केली. जळगाव शहरातील महावितरण कंपनीचे सबस्टेशनच्या अंतर्गत महाबळ येथील कार्यालयात बुधवार, २२ मे रोजी रात्री १२.४५ मिनिटांनी ही घटना घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली  आहे.

जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रोडवरील महावितरण कंपनीचे सबस्टेशनच्या अंतर्गत महाबळ येथे कार्यालय आहे. या ठिकाणाहून खंडेराव नगर, हरीविठ्ठल नगर, वाघ नगर, रामानंदनगर, समता नगर येथे विद्युतपुरवठा करण्याचे काम केले जाते. दरम्यान बुधवारी २२ मे रोजी रात्री १२.४५ वाजता हरीविठ्ठल नगरमध्ये राहणारा दीपक सपकाळे यांच्यासह एक जण असे २ जण महाबळ कार्यालयात येथे आले. त्या ठिकाणी कर्मचारी किरण दत्तात्रय सपकाळे रा. दादावाडी हे कामावर हजर होते.

दरम्यान दीपक सपकाळे हा तेथे येऊन कर्मचारी किरण सपकाळे यांना लाईट चालू बंद का करतो ? असे बोलून कार्यालयात ओढून बेदम मारहाण केली. तसेच कार्यालयाच्या बाहेर येऊन दोघांनी कार्यालयावर दगडफेक केली व निघून गेले.

घटना घडल्यानंतर सकाळी ११ वाजता महावितरण कंपनीच्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात  तक्रार दिली. शेवटचे वृत्त असे आले तेव्हा सायंकाळी मारहाण करणाऱ्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.