विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज, केव्हाही लागू होऊ शकते आचारसंहिता

जळगाव – राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ नोंव्हेंबर २०२४ दरम्यान संपुष्टात येत आहे. त्या दृष्टीकोनातून राजकिय तसेच प्रशासकिय पातळीवरून जिल्ह्यासह राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचे वेध सर्वानाच लागलेले आहेत.
जिल्ह्यात विधानसभेचे अकरा मतदार संघ आहेत तर ३६ लाख मतदार संख्या आहेत.मतदान प्रकियेसाठी लागणारे मतदान केंद्र, अंतिम मतदार यादी व इव्हीएम बॅलट युनिटची पडताळणी करण्यात आली आहे. केंद्र तसेच राज्य निवडणूक आयोगाकडून केव्हाही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेता आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने म्हटले आहे.

मतदार संख्येत ५० हजारांनी वाढ
जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ३५ लाख २७ हजार ९७३ मतदार होते. तर जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात ३ हजार ५८२ मतदान केंद्र होते. सद्यस्थितीत नवमतदार नोंदणीनुसार ३६ लाख १६ हजार ४०३ अशी मतदार संख्येत वाढ झाली आहे.

एका मतदान केंद्रांवर किमान १५०० मतदार
लोकसभेच्या वेळी मतदान केंद्रांवर मतदानासाठी लागणारा वेळ व गर्दी पहाता विधानसभेच्या वेळी मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी एका मतदान केंद्रावर किमान १ हजार ५०० मतदार या संख्येनुसार मतदान केंद्र निश्चिती करण्यात आली आहे.

मतदार वाढीनुसार मतदान केंद्र संख्येत भर
लोकसभेत ३५ लाख मतदारांची संख्या होती. सद्यस्थितीत विधानसभा मतदानापूर्वी ४८ हजार ४३० अशी वाढलेली नवमतदार संख्या आहे. मतदार संख्या वाढ लक्षात घेता त्यानुसार जिल्ह्यातील ११ मतदार संघात ९५ मतदान केंद्र वाढविण्यात आले असून ३ हजार ६७७ मतदान केंद अस्तीत्वात आलेले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

विधानसभा मतदारसंघ व मतदान केंद्रांची संख्या
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीदरम्यान जिल्ह्यात ३ हजार ५८२ मतदान केंद्र होती. त्यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ९५ मतदान केंद्रांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव शहर ३५८, जळगाव ग्रामीण ३५३, एरंडोल-पारोळा २९८, अमळनेर ३२५, पाचोरा-भडगाव ३५४, चाळीसगाव ३४४, जामनेर ३४२, भुसावळ ३१६, मुक्ताईनगर-बोदवड ३२२, रावेर-यावल ३२८ आणि चोपडा ३३७ असे एकूण ३  हजार ६७७ मतदान केंद्र आजमितीस आहेत.

मतदार यंत्र तपासणी पडताळणी पूर्ण
राज्य सरकारचा कार्यकाल ३० नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. त्यापूर्वी विधानसभेची सार्वत्रिक निवडणुक होणे गरजेचे आहे. म्हणून राज्यात १५ ऑक्टोबरपूर्वी केव्हाही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघांसाठी लागणारी मतदान यंत्रे मतदारसंघात तपासून पाठविली आहेत. आचारसंहिता जाहीर होताच अधिकारी, कर्मचाऱ्याचे नियुक्ती, प्रशिक्षण सुरू होणार आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आम्ही तयार
विधानसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम केली असून त्यानुसार मतदानाची केंद्रेही निश्चित करण्यात आली आहेत. यात लोकसभेच्या मतदान प्रकियेदरम्यान मतदानासाठी लागलेल्या रांगा व वेळ पहाता १५०० पेक्षा अधिक मतदार संख्या असेल, त्या केंद्राचे विभाजन करून दुसऱ्या केंद्राला जोडण्यात आले आहे. मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करून अकरा विधानसभा मतदारसंघांत पाठविण्यात आलेली आहेत. मतदानाच्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे.