विरोधकांच्या अग्निवीर योजनेवरील आरोपांना सडेतोड उत्तर; अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी सोडले मौन, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाली. त्यांनी कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानला दहशतवाद्याला प्रोत्साहन देण्यावरुन इशारा पण दिला. त्यांनी सैनिकांचे मनोबल वाढवले. या बजेटमध्ये संरक्षणासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. या कार्यक्रमात अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्निवीर योजनेवर मौन सोडले. लोकसभा निवडणुकीत अग्निवीर योजनेवरुन विरोधकांनी मोठी टीका केली होती. त्याला मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले.

लष्करात अनेक सुधारणा
सैन्यदलात गेल्या काही वर्षात अभूतपूर्व बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय लष्कराने गेल्या काही वर्षात साहस दाखवल्याचे कौतुक त्यांनी केले. यावेळी त्यांनी अग्निपथ योजनवरुन देशात सध्या सुरु असलेल्या गदारोळाचा त्यांनी समाचार घेतला. अग्निपथ योजना ही लष्करातील सुधारणांचे एक चांगले उदाहरण असल्याचे ते म्हणाले.

अग्निवीर योजनेवरुन विरोधकांवर पलटवार
अग्निवीर योजनेविरोधात विरोधकांनी रान पेटवले होते. लोकसभा निवडणुकीत सुद्धा हा महत्वाचा मुद्दा होता. विरोधकांच्या या हल्लाबोलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमध्ये प्रत्युत्तर दिले. देशाचे सैन्यदल तरुण असावे यासाठी यापूर्वी संसदेकडून प्रयत्न झाले. त्यासाठी समिती पण गठीत करण्यात आली. पण पुढे काहीच झाले नाही. कोणीच त्यात काही बदल करण्याची इच्छा शक्ती दाखवली नाही. या सरकारने हा मुद्दा हाती घेतला. लष्कर तरुण असावे यासाठीच अग्निवीर योजना आणल्याची माहिती त्यांनी दिली.

सलामी देणे, परडे करणे म्हणजे लष्कर नाही
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या मानसिकतेवर प्रहार केला. सैन्य दल काही लोकांसाठी मोठ्या नेत्यांना सलामी देणे आणि परडे करणे असेच असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना हाणला. पण आमच्यासाठी सैन्यदलाचा अर्थ १४० कोटी जनतेचा विश्वास आहे. त्यांच्या शांततेची हमी असल्याचे ते म्हणाले. अग्निपथ योजनेतून देशाचे हे महत्वाचे स्वप्न साकारण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलेच खडसावले. यापूर्वी पाकिस्तानला प्रत्येकवेळी भारताने मात दिली आहे. पण पाकिस्तान इतिहासापासून काहीच शिकला नसल्याचे ते म्हणाले. दहशतवाद्याच्या मदतीने या भागात युद्धस्थिती सुरु ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.