इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार आज तालुक्याच्या दौऱ्यावर असताना इंदापूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलतांना अजित पवार म्हणाले, प्रत्येकाचा काळ असतो…चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेचे येतातच आता चार दिवस सासवांचे गेले आहेत. आता सुनांचे दिवस आले आहेत.. अर्थात तुम्ही बटन दाबलं तर…असे सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
अजित पवारांनी वक्तव्य केल्यानंतर एका कार्यकर्त्याने बटन काळं निळं होणार, अशी ग्वाही दिली. यावर पवार म्हणाले की, एवढं नको दाबू हळूच दाब, कुठेही दाबताना कोणालाही काळं निळं करू नको. आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. मला बोलायला मर्यादा आहेत. पुढं कार्ट बसलयं मागे बायको आहे. हे दोघे नसते तर तुम्हाला सांगितलं असतं, असं गमंतीने म्हणतात एकच हशा पिकला. आपल्या सर्वांवर टीका होईल. विरोधी पक्षाकडून डिवचण्याचा प्रयत्न होईल. फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. पुढचे दोन महिने काम करण्याचे आवाहनही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले.
पुन्हा एकदा आपल्या विचारांचा खासदार निवडून देऊन केंद्रात आपल्या विचाराचे सरकार आणायचे आहे. राज्यातील कामे केंद्राकडून मंजूर करेल, अशी खात्री यावेळी पवार यांनी दिली. आपली कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी कुठेही कमी पडणार नाहीत. हा विश्वास मी सर्वांना देतो. मात्र लोकसभेच्या मतदानादिवशी घड्याळाचे बटन दाबायचं, असे आवाहनही पवार यांनी केले.