अमळनेर : बदलापूर, सिन्नर तालुक्यात अल्पवयीन बालिकांवर अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच अशीच घटना अमळनेर तालुक्यात घडलीय. येथे ६५ वर्षीय वृद्धाने मूकबधिर बालिकेवर अत्याचार केले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे.
अमळनेर तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मूकबधिर बालिका आजी-आजोबांसोबत वास्तव्याला आहे. तर आई अहमदाबाद (गुजरात) येथे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिवार्ह करते. दरम्यान, घरी कुणी नसल्याचा फायदा घेत, गावातील एका ६५ वर्षीय वृद्धाने या मूकबधिर बालिकेवर अत्याचार केले.
या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयितावर भारतीय न्याय संहिता कलम 64(2), 64 (2) (1) ,64 (2) (k), 65 (1), पोस्को कायद्याचे कलम 3(अ), 3(क), 4, (5) (के), 7, 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.